राष्ट्रवादी समविचारींसोबत; भाजप, काँग्रेस अन् सेनेचाही स्वबळाचा विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:43 IST2021-08-28T04:43:33+5:302021-08-28T04:43:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाई नगरपालिकेत बहुमत मिळूनदेखील नगराध्यक्ष पदापासून लांब राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या पाच वर्षात त्याची किंमत मोजावी ...

राष्ट्रवादी समविचारींसोबत; भाजप, काँग्रेस अन् सेनेचाही स्वबळाचा विचार
लोकमत न्यूज नेटवर्क
वाई
नगरपालिकेत बहुमत मिळूनदेखील नगराध्यक्ष पदापासून लांब राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या पाच वर्षात त्याची किंमत मोजावी लागली आहे. त्यामुळे यावेळी कोणताही धोका न पत्करता समविचारी पक्षांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस रिंगणात उतरणार आहे. भाजप सक्षम पर्याय शोधण्याच्या तयारीत असून, मिळणाऱ्या ताकदीवर या निवडणुकीतील त्यांची रणनीती स्पष्ट होईल. काँग्रेस आणि भाजप स्वतंत्र लढण्याचा विचार करत असले तरी शिवसेना परिस्थिती पाहून निर्णय घेणार आहे. त्यामुळे वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत यावेळी जोरदार घमासान पहायला मिळणार आहे.
वाई नगरपालिका १८५५ साली स्थापन झाली. २०११ च्या जणगणनेनुसार वाई शहराची लोकसंख्या ३६०२५ आहे. २०१६ मधील निवडणुकीत राष्ट्रवादी प्रणित तीर्थक्षेत्र आघाडीने मुसंडी मारत २० पैकी १४ जागा पटकावल्या तर वाई विकास महाआघाडीने ६ जागा जिंकल्या; परंतु थेट जनतेतून फक्त एका मताची सरशी करून डॉ. प्रतिभा शिंदे निवडून आल्याने व एक मताने तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या शोभा रोकडेंचा झालेला पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला होता; परंतु निवडून आल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात नगराध्यक्ष डॉ प्रतिभा शिंदे या लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडल्याने अडचणी आल्या होत्या. त्याप्रकरणी पंधरा दिवसांपूर्वी राज्याच्या नगरविकास मंत्रालयाने त्यांना अपात्र ठरवल्याचा निर्णय दिल्याने उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांना नगराध्यक्षपदी संधी मिळाल्याने राष्ट्रवादीमध्ये चैतन्याचे वातावरण असून, उर्वरित कालावधीत जास्तीत जास्त कामे मार्गी लावण्याचा सपाटा लावल्याचे चित्र पालिकेत दिसत आहे.
निवडणूक आयोगाने नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कच्च्या वॉर्ड रचना तयार करण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. त्यामुळे वाई पालिका वर्तुळात राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. निवडणुकीच्या संदर्भाने आराखडे होऊ लागले आहेत; पण या निवडणुकीत पक्षीय झेंडे झळकणार की पुन्हा आघाड्यांचेच राजकारण होणार, याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. सुरुवातीच्या काळात पक्ष किंवा आघाडी असे राजकारण येथे होत नव्हते. मतदारसंघातील आमदारांच्या गटाचे वर्चस्व येथे राहिले आहे; पण १९९९ पासून पालिकेत आघाड्यांचे राजकारण सुरू झालेले दिसते. सन २०१६ साली झालेल्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीर्थक्षेत्र विकास आघाडीने १४ जागा जिंकत बहुमत मिळवले तर दोन स्वीकृत नगरसेवक असे १६ संख्या झाली; पण भाजपच्या डॉ. प्रतिभा शिंदे यांनी थेट नगराध्यक्ष निवडणुकीत एका मताने सरशी करत मारलेली बाजी राष्ट्रवादीला अस्वस्थ करणारी होती, तसेच वाई विकास महाआघाडीच्या माध्यमातून ६ नगरसेवक निवडून आले. गतवेळी १० प्रभागातून २० नगरसेवक निवडून आले होते. यावर्षी प्रभाग रचनेत बदल होऊन सिंगल वॉर्ड रचना होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे २० वॉर्डमधून प्रत्येकी एक नगरसेवक निवडला जाईल, अशी परिस्थिती आहे.
आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आमदार मकरंद पाटील व नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी आघाडीचे संकेत दिले असून, परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असे सुतोवाच केले आहे. काँग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्ष विराज शिंदे व तालुकाध्यक्ष रवींद्र भिलारे तरुणांना संधी देऊन स्वबळावर सर्व जागा लढविणार असल्याची चर्चा आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष रोहिदास पिसाळ व शहराध्यक्ष राकेश फुले यांनीही भाजप सर्व जागा पक्षाच्या चिन्हावर लढणार असल्याची माहिती दिली. तर शिवसेनेचे तालुका अध्यक्ष अनिल शेंडे व शहराध्यक्ष किरण खामकर यांनी राष्ट्रवादीने सन्मानाने आघाडीमध्ये घेतले तर आघाडी अन्यथा स्वबळावर सर्व जागा लढविणार असल्याचे म्हटले आहे. आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात पक्षीय झेंडे खांद्यावर घेतले जाणार की पुन्हा आघाड्यांच्याच राजकारणाचा खेळ होणार, हे पाहावे लागणार आहे.
गत साडेचार वर्षांचा पालिकेतील कारभार पाहिला तर फक्त सत्तेचे त्रांगडे पाहायला मिळाले आहे. नगराध्यक्ष डॉ. प्रतिभा शिंदे यांच्याकडे बहुमत नसल्याने त्यांची कसरत वाईकरांनी पाहिली आहे. तर बहुमतात असलेल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीने त्यांना घेरण्याची एकही संधी सोडली नाही. अनेक वेळा आघाड्यांमध्ये झालेला संघर्ष वाईकरांनी पाहिला आहे. एकूणच वाई कृष्णातीरावर राष्ट्रवादी समविचारींना बरोबर घेण्याच्या विचारात आहे. भाजपा, काँगेस स्वबळावर पक्ष चिन्हावर तर शिवसेना सन्मानाने आघाडीत स्थान न मिळाल्यास सर्व जागा स्वबळावर लढणार असल्याने पालिकेच्या निमित्ताने कृष्णा तीरावर निवडणुकीचे घमासान होणार, हे मात्र पक्के आहे.
१. आघाड्यांमधील रस्सीखेच
साडेचार वर्षात तीर्थक्षेत्र विकास आघाडी व वाई विकास महाआघाडी यांच्यात अनेकदा झालेला टोकाचा संघर्ष वाईकरांनी पाहिला; परंतु विकासाच्या अनेक मुद्द्यावर एकत्र येत काही चांगले निर्णयही झाले.
२. गेल्या साडेचार वर्षात राज्य शासनाकडे पाठपुरावा करून आमदार मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरण तलाव, सोनगीरवाडी स्मशानभूमी, नावेचीवाडी येथील मुख्य रस्त्यावरील पूल, प्रत्येक प्रभागात व्यायामशाळा ही कामे पूर्ण झाली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे काम प्रगतीपथावर आहे तर किसनवीर चौकाला जोडणारा कृष्णा नदीवरील पंधरा कोटीचा पूल व फुलेनगर येथील किवऱ्या ओढ्यावरील चार कोटींचा पूल मंजूर झाला आहे. ही कामे मार्गी लागली असून, अजूनही वाईकर नाट्यगृह व क्रीडा संकुलच्या प्रतीक्षेत आहेत.
सध्याचे पक्षीय बलाबल
राष्ट्रवादी काँग्रेस - १४
भाजप - ६
स्वीकृत - २