शरीरसौष्ठव स्पर्धेतील राष्ट्रीय पंच : अश्विनी हेंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:12 IST2021-02-05T09:12:26+5:302021-02-05T09:12:26+5:30
एखाद्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्ताने गावागावात शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्याचप्रमाणे जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरही शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित केल्या ...

शरीरसौष्ठव स्पर्धेतील राष्ट्रीय पंच : अश्विनी हेंद्रे
एखाद्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्ताने गावागावात शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्याचप्रमाणे जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरही शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित केल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने पुरुषांचीच मक्तेदारी आहे. कित्येक तास व्यायाम करायचा. जीम लावून प्रचंड मेहनत करून शरीर कमवले जाते. यामध्ये तरुणांचा ओढा जास्त असतो. साताऱ्यातील राजेंद्र हेंद्रे हे बॉडी बिल्डिंग क्षेत्रात कार्यरत होते. जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या माध्यमातून जास्तीत जास्त स्पर्धा भरवल्या जाव्यात म्हणून ते प्रयत्न करत होते. स्पर्धेच्या ठिकाणी ते स्वत: जात असत. या प्रवासात त्यांची मुलगी अश्विनी कायम असायची.
शरीर सौष्ठव स्पर्धा पाहण्यासाठी अश्विनी वडिलांसोबत जात असत. त्यातून त्यांच्यात या खेळाबाबत आवड निर्माण झाली. अश्विनी यांनी वाणिज्य शाखेतून पदवी संपादन केल्यानंतर डिप्लोमा इन फिटनेस हा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर कऱ्हाड येथील मुरली वत्स यांच्याकडे जीमचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी तीन वर्षे फिटनेस ट्रेनर म्हणून काम केले. यातूनच शरीरसौष्ठव स्पर्धेतील पंच या नवीन करिअरची दिशा मिळाली. २००५ मध्ये शरीर सौष्ठव स्पर्धेच्या पंचची परीक्षा दिली. त्यानंतर विविध पातळीवरील स्पर्धा दिल्या. अश्विनी हेंद्रे यांनी आतापर्यंत तीनशेहून अधिक स्पर्धांचे पंच म्हणून काम केले आहे. त्यामुळे या खेळाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोनही बदलला आहे. त्यामुळे मुलींचाही सहभाग या खेळाकडे वाढत आहे, याचे समाधान अश्विनी हेंद्रे यांना जाणवते. अश्विनी यांचे पती चिराग बगाडे हे सुद्धा बास्केट बॉल प्रशिक्षक आहेत.
चौकट
वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी सहभाग
मुंबईत २०१४ मध्ये वर्ल्ड चॅम्पिअनशिप स्पर्धेचे आयोजन केले होते. त्याठिकाणी पंच म्हणून काम करता येणार नव्हते. पण स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी पडद्यामागची महत्त्वाची जबाबदारी माझ्यावर आली होती.
कोट :
शरीरसौष्ठव स्पर्धेत पंच म्हणून काम करताना मानधन मिळते. त्यातून घर चालू शकत नाही. पण तरुणींनी फिटनेस ट्रेनर म्हणून करिअर केल्यास नक्कीच चांगले दिवस आहेत.
- अश्विनी हेंद्रे-बगाडे
फोटो आहे...
३०अश्विनी हेंद्रे
- जगदीश कोष्टी