सोलापूर येथे राष्ट्रीय महाधिवेशन : लक्ष्मण माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:37 IST2021-03-24T04:37:39+5:302021-03-24T04:37:39+5:30

सातारा : सातारा येथे झालेल्या भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या राज्य कार्यकारिणीमध्ये ३१ ऑगस्ट रोजी सोलापूर येथे राष्ट्रीय ...

National Convention at Solapur: Laxman Mane | सोलापूर येथे राष्ट्रीय महाधिवेशन : लक्ष्मण माने

सोलापूर येथे राष्ट्रीय महाधिवेशन : लक्ष्मण माने

सातारा : सातारा येथे झालेल्या भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या राज्य कार्यकारिणीमध्ये ३१ ऑगस्ट रोजी सोलापूर येथे राष्ट्रीय महाधिवेशन आयोजित करण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी दिली.

भटक्या विमुक्त जमातींची तिसरी यादी या बैठकीत फेटाळण्यात आली. यापुढे संघटना भटक्या विमुक्त या शब्दाचा वापर करणार नाही. त्यामुळे संघटनेचे नाव बदलण्यात आले आहे. यापुढे भारतीय आदिवासी जमाती संघम या नावाने संघटना कार्य करील. या अधिवेशनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह विविध मान्यवरांना निमंत्रण देणार असल्याची माहिती माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते पुढे म्हणाले, १८७१ च्या गुन्हेगार जमाती कायद्याला ३१ ऑगस्ट २०२१ रोजी १५० वर्षे पूर्ण होतात. हा कायदा १९५२ साली दुरुस्त करण्यात आला. तद्नंतर त्याचे रूपांतर संशयित गुन्हेगारी जमाती कायद्यामध्ये करण्यात आले. हा कायदा संपूर्ण देशासाठी होता. देशभर गुन्हेगारी जमातीच्या वसाहती केल्या होत्या. तीन तारांच्या कंपाऊंडमध्ये या चिन्हांकित जमाती डांबण्यात आल्या होत्या. म्हणजेच खुल्या कारागृहात ठेवण्यात आल्या होत्या. ८० वर्षे इंग्रज सरकारने जन्मत:च गुन्हेगार ठरवून त्यांना गुन्हेगार बनवले होते. देशभर या कायद्याने अस्तित्वात असलेल्या जमाती, अनुसूचित जमाती किंवा अनुसूचित जाती यांच्या याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडूमध्ये मात्र तिसरी सूची करण्यात आली आहे. माने पुढे म्हणाले, राष्ट्रीय अधिवेशनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येच्युरी, सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यासह विविध मान्यवरांना निमंत्रण देण्यात येणार आहे.

Web Title: National Convention at Solapur: Laxman Mane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.