नथुरामाचे उदात्तीकरण नको
By Admin | Updated: December 29, 2014 23:53 IST2014-12-29T22:27:13+5:302014-12-29T23:53:55+5:30
स्वातंत्र्यसैनिकांचा सत्याग्रह : कऱ्हाडच्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ निषेध

नथुरामाचे उदात्तीकरण नको
कऱ्हाड : महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करण्याच्या काही वृत्तींचा प्रयत्न सुरू असून, त्याच्या निषेधार्थ येथील कोल्हापूर नाक्यानजीक महात्मा गांधी पुतळा परिसरात सोमवारी जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांतर्फे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले़ यावेळी महात्मा गांधी यांची हत्या कणाऱ्याचे गौरवीकरण नको, अशी मागणी करण्यात आली़
उत्तर प्रदेशात नथुराम गोडसेचे मंदिर उभारण्याचा घाट काही प्रवृत्तींनी घातला आहे. ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये १९४२ च्या चले जाव आंदोलनात, प्रतिसरकार लढ्यात, तसेच मिठाचा सत्याग्रह, गोवा मुक्ती संग्राम, भूमिगत चळवळ अशा लढ्यांतून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला, अशा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांकडून या प्रवृत्तींचा धिक्कार करण्यात आला. आंदोलनास ३५ हून अधिक ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांनी हजेरी लावली होती़ दरम्यान, यापुढेही असाच लढा चालू ठेवून देशविघातक शक्तींविरोधात नेहमीच अहिंसेच्या मार्गाने आपली भूमिका मांडू, असे मत स्वातंत्र्यसेनानी भाई पंजाबराव चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले़
यावेळी प्रतिसरकार स्मारक समितीचे स्वातंत्र्यसेनानी डी़ एम़ पाटील, जिल्हा स्वातंत्र्य सैनिक कल्याण सुकाणू समितीचे पंजाबराव फाळके, विजय देशापांडे, महात्मा गांधी स्मारक समितीचे स्वातंत्र्यसेनानी अण्णा सापते, कामगार शेतकरी संघर्ष समितीचे अस्लम तडसरकर, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गुलाबराव ढमाळे, नारायण पाटील, वसंत पारवे, जालिंदर पाटील, कॉ़ डी़ एस़ पाटील, भानुदास पाटील, हणमंत थोरात आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
९६ व्या वर्षीही सत्याग्रहात सहभागी
क्रांतिसिंह नाना पाटील, दिवंगत यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, क्रांतिवीर किसन वीर, जी़ डी़ बापू लाड यांच्याबरोबर काम केलेले, चलेजाव चळवळ, मिठाचा सत्याग्रह, प्रतिसरकार आंदोलन, भूमिगत लढ्यामध्ये सहभाग घेतलेले, राष्ट्रपतीपदक प्राप्त सोपानराव घोरपडे (रा. रहिमतपूर, ता.कोरेगाव) यांनी ९६ व्या वर्षीही त्यांच्यातील स्वातंत्र्यसैनिक जागा ठेवून या सत्याग्रहात सहभाग घेतला़