नरेंद्र मोदी हे केवळ गुजरातचे पंतप्रधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:36 IST2021-05-22T04:36:03+5:302021-05-22T04:36:03+5:30
सातारा : तौक्ते चक्रीवादळामुळे देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील पाच राज्यांना मोठा फटका बसला आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ ...

नरेंद्र मोदी हे केवळ गुजरातचे पंतप्रधान
सातारा : तौक्ते चक्रीवादळामुळे देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील पाच राज्यांना मोठा फटका बसला आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ गुजरात राज्याची हवाई पाहणी करून या राज्याला एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. बाकीच्या राज्यांना मात्र केंद्राने कोणतीच मदत दिलेली नाही. त्यामुळे मोदी हे केवळ गुजरातचे पंतप्रधान आहेत का? अशी टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
येथील काँग्रेस कमिटीमध्ये दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी ते आले होते. अभिवादन कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
समुद्रात ओएनजीसीचे जहाज बुडून जवळपास ८७ लोक बेपत्ता झाले. त्यामध्ये ५० ते ६० मृतदेह सापडले आहेत. या घटनेची केंद्र सरकारने चौकशी लावली आहे. तेल खात्याच्या अधिपत्याखालील चौकशी समिती ही पक्षपातीपणाने ही चौकशी करणार नसल्याने काँग्रेस पक्षाला ही मान्य नाही. आता शिपिंग खात्याच्या अधिपत्याखाली केंद्राने ही चौकशी लावलेली आहे. वादळाचा इशारा दिला असतानाही तो डावलून समुद्रात कोणाच्या आदेशावरून नेण्यात आले, त्याची सखोल चौकशी केली जावी, अशी काँग्रेसची मागणी आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने कोरोना महामारीचा धोका ओळखून योग्यवेळी लसीकरणाला परवानगी दिली नाही. आता राज्याने लस घेऊन नागरिकांना द्यावी, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. टेंडर पद्धतीने लसी खरेदी करण्याचे केंद्र सांगत आहे. असे केले तर चढाओढ लागून जास्त किमतीने लस खरेदी करावी लागेल आणि त्याचा भुर्दंड जनतेवर पडणार आहे.
वास्तविक, ही महामारी राष्ट्रीय आपत्ती असल्याने केंद्राच्या खजिन्यातून लस खरेदी करून ती प्रत्येक नागरिकाला मोफत देण्यात यावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. महामारी रोखण्यासाठी केंद्र सरकारने ३५ हजार कोटी रुपये अंदाजपत्रकात निधी राखून ठेवला आहे. या निधीचे काय होणार आहे? असा प्रश्न उपस्थित करून आमदार चव्हाण यांनी, नागरिकांना मोफत लस देण्यासाठी केंद्र सरकारने कर्ज काढावे असे सुचवले आहे.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, शिवराज मोरे, बाबासाहेब कदम, रजनी पवार, मनोजकुमार तपासे, धनश्री महाडिक, विराज शिंदे, मनोहर शिंदे, अन्वर पाशा खान, दत्तात्रय धनवडे, प्रकाश फारांदे, नाना लोखंडे, राजेंद्र शेलार, बाबूराव शिंदे, चिन्मय जंगम, अमर करंजे आदी उपस्थित होते.
राजीव गांधींचे शिक्षण क्षेत्रातील कार्य महान
दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली. नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना त्यांनी करून दूरगामी शैक्षणिक क्रांती घडवून आणली आहे, अशा शब्दांत आमदार चव्हाण यांनी राजीव गांधी यांच्या स्मृतींना उजाळा दिला.