नाना पाटेकरांचा नवा पत्ता... मु. पो. भुर्इंज !
By Admin | Updated: January 23, 2015 23:35 IST2015-01-23T21:36:13+5:302015-01-23T23:35:12+5:30
डॉयलॉग नाही कविता

नाना पाटेकरांचा नवा पत्ता... मु. पो. भुर्इंज !
भुर्इंज : ‘किसन वीर कारखान्यावर उभारण्यात आलेले उपक्रम हे एका दिवसात पाहता येतील; पण समजून घ्यायचं असेल, तर त्यासाठी अधिक वेळ दिला पाहिजे. एक झाड लावायचं आणि जगवायचं तर त्याला किती कष्ट पडतात, हे हाडाचा शेतकरी म्हणून मला माहिती आहे. त्यामुळेच येत्या तीस दिवसांत पाच दिवस मी येथे राहायला येणार आहे. या पाच दिवसांत मी हा परिसर पाहणार आहे, समजून घेणार आहे. ज्यांना कोणाला मला भेटायचं असेल, बोलायचं असेल त्यांनी जरूर येथे यावं,’ असे निमंत्रणच अभिनेते नाना पाटेकर यांनी सर्वांना दिले.भुर्इंज, ता. वाई येथील किसन वीर सहाकरी साखर कारखान्याच्या वतीने नामयज्ञ सोहळ्याचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शन आणि पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन नाना पाटेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या भेटीत नाना पाटेकर यांच्यातील संवेदनशील माणूस, कवी आणि शेतकऱ्याचेही उपस्थितांना दर्शन झाले. ते म्हणाले, ‘आयुष्यात मला खूप मिळालं. आता मला जुने दिवस जगायचे आहेत. म्हणूनच मी सिंहगडाच्या पायथ्याला शेती करीत आहे. एक शेतकरी म्हणून किसन वीर कारखान्यावर उभारण्यात आलेले प्रकल्प आणि शेतकऱ्यांसाठी केले जाणारे काम भावले आहे. माझ्या शेतातील एखाद्या झाडाची फांदी जरी कोणी तोडली तरी मी त्याला शिव्या घालतो. त्याला मी म्हणतो, तुझे बोट मोडले तर कसे वाटेल? माझे मातीशी नातं कायम आहे. कारण माती हेच वास्तव आहे.
आजपर्यंत मी कधीच कुठल्या देवळात गेलो नाही आणि त्याची मला कधी गरजही वाटली नाही. कारण आपले देव म्हणजे आई आणि वडील. मदन भोसले यांनी आपल्या वडिलांचा वारसा भक्कमपणे चालविला आहे. कारखान्याकडे लक्ष देताना, त्याचा व्याप वाढविताना राजकारणाकडे जरूर दुर्लक्ष झाले असेल. त्याचा परिणाम म्हणून निवडणुकीत पराभव झाला असेल एवढे चांगले काम उभे करताना त्याचे परिणाम भोगावे लागले असतील तर हरकत नाही. आज नाही तर उद्या लोकांच्या लक्षात ती गोष्ट येईल.’काही दिवसांपूर्वी ‘पुरुष’ नाटक पुन्हा करण्याची इच्छा नाना पाटेकर यांनी व्यक्त केली होती. त्याबाबत बोलताना त्यांनी नाटक करण्याची इच्छा नसल्याचे सांगितले. बाबा आमटे यांचे काम मला पहिल्यापासून भावले आहे. त्यांच्या तिसऱ्या पिढीशी माझा संबंध आणि संवाद आहे. त्यांचे काम अनेक लोकापर्यंत पोहोचावे, या हेतूने बाबा आमटे यांच्या जीवनावरील चित्रपटात काम केले. तो माझ्या आनंदाचा भाग होता,’ असेही ते म्हणाले.सुरुवातीला नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत १२०० आंब्यांच्या रोपांची लागवड टाळ मृदुंगाच्या आणि ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे..’ या अभंगाच्या गजरात करण्यात आली. दरवर्षी मान्यवर, शेतकरी व वारकऱ्यांच्या हस्ते अशा पद्धतीने होणारे वृक्षारोपण पाहून नाना पाटेकर भारावून गेले.कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद यादव, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर,जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विजय माईनकर, पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर, जिल्हा परिषद सदस्या राजनंदा जाधव, राधा शिंदे, नीलिमा भोसले, कारखान्याचे संचालक नारायण पवार, नंदाभाऊ जाधव, रोहिदास शिंदे, संदीप पोळ, कार्यकारी संचालक विजय वाबळे आदी उपस्थित होते. मदन भोसले यांनी स्वागत केले. बाबूराव शिंदे यांनी प्रास्ताविक केले, रोहिदास पिसाळ यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
डॉयलॉग नाही कविता
बाबूराव शिंदे यांनी नाना पाटेकर हे उत्तम कवी आहेत, असे सांगून त्यांना कविता सादर करण्याचा आग्रह केला. त्यावर नाना पाटेकर यांनी कविता सादरही केली. मात्र, त्यानंतर त्यांना उपस्थितांमधून डॉयलॉग म्हणण्याचा आग्रह झाला. त्यावेळी मात्र पैसे दिल्याशिवाय गळ्यातून डायलॉग उतरत नाही, अशी कोटी केली. नाना पाटेकर यांना भेटण्यासाठी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी अनेकजण उत्सुक होते. त्या सर्वांच्या खांद्यावर हात टाकून ‘काय रे, कसा आहेस,’ अशी विचारणा करून त्यांनी मने जिंकली.