यादवांच्या मेळाव्यात नमो नम: !
By Admin | Updated: September 16, 2014 23:56 IST2014-09-16T21:53:26+5:302014-09-16T23:56:01+5:30
निर्णय नाहीच : बहुतांश कार्यकर्त्यांचा ‘हातात कमळ’ धरण्याकडेच कल

यादवांच्या मेळाव्यात नमो नम: !
कऱ्हाड : विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घ्यावी, यासाठी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात आज ‘नमो नम:’ चा सुर ऐकायला मिळला. काहींनी विचारपूर्वक निर्णय घेण्याचा सल्लाही दिला.
यादव यांनी कार्यकर्त्यांचा निर्णयच अंतीम मानणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, अंतीम निर्णय १९ सप्टेबरच्या पुढे ढकलण्यात आला. त्यांच्या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
कऱ्हाड पालिकेत सात नगरसेवकांच्या जोरावर उपनगराध्यक्ष यादव यांनी यशवंत विकास आघाडीचे अस्तित्व स्वतंत्र ठेवले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यादव गटाच्या भूमिकेला महत्व प्राप्त झाले आहे. त्याबाबतचा निर्णय घेण्यासाठीच आज यादव गटाचा मेळावा आयोजीत करण्यात आला होता.
मेळाव्याला उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांच्यासह बांधकाम सभापती प्रमोद कदम, नगरसेवक हणमंत पवार, विजय वाटेगावकर, संगीता देसाई, शितल वायदंडे, नुरबानू रोहीले, माजी उपनगराध्यक्ष फारूख पटवेकर, भाजपचे विष्णू पाटस्कर, मराठा महासंघाचे बाळासाहेब पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर मनोगत व्यक्त करताना ‘कमळ’ फुलताना दिसत होते. तोच धागा पकडत भाजपच्या पाटस्करांनी ‘आम्ही आपले स्वागतच करू,’ असे सुतोवाच केले. हणमंत पवार, प्रमोद कदम, संगीता देसाई यांनीही ‘सर्वांचे लक्ष आपल्या निर्णयाकडे आहे. तेव्हा आपण विचारपूर्वक निर्णय घ्याल,’ अशी अपेक्षा व्यक्त केली. फारूख पटवेकर यांनी ‘तुमचा राजकिय प्रवास चांगला आहे; पण चुकीचा निर्णय घेऊ नका, प्रसंगी पक्षविरहीत निर्णय घ्या. म्हणजे आम्हाला तुमच्या मागे राहणे सोपे होईल,’ असा सल्ला दिला. तोच धागा पकडत अन्य दोन वक्त्यांनी सबुरीचा सल्ला दिला तर प्रीतम यादव यांच्यासह काही तरूणांनी ‘भाजपची उमेदवारीच तुम्ही घ्या,’ असा आग्रह धरला.
राजेंद्र यादव यांनी मात्र तुमच्या पाठबळावर माझा राजकीय प्रवास सुरू आहे. जनहित लक्षात घेऊनच राजकिय निर्णय घेणार आहे. आज तुमची मते जाणून घेतली. (प्रतिनिधी)
प्रवेशाच्या घडामोडी लवकरच!
मंगळवारच्या मेळाव्यात जरी निर्णय झाला नसला तरी शुक्रवार, दि. १९ रोजी राजेंद्र यादव यांच्या कार्यक्रमाला ‘भाजप’चे खासदार संजय पाटील यांची विशेष उपस्थिती आहे. त्यादिवशी यादवांच्या भाजप प्रवेशाबाबत महत्वपूर्ण घडामोडी होतील, अशी साऱ्यांनाच खात्री आहे.