‘फ्लेक्स’वर झळकणार थकबाकीदारांची नावं !
By Admin | Updated: December 4, 2014 00:45 IST2014-12-04T00:36:15+5:302014-12-04T00:45:17+5:30
खटाव तालुका : धडक मोहीम सुरू; पंचायत समितीची १२ पथके तयार

‘फ्लेक्स’वर झळकणार थकबाकीदारांची नावं !
पुसेगाव : खटाव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या थकीत कर वसुलीसाठी वडूज पंचायत समितीने बारा करवसुली पथके तयार केली आहेत. त्याबाबत धडक मोहीम उघडण्यात आली असल्याची माहिती गटविकास अधिकारी राहुल देसाई व भागविस्तार अधिकारी बी.बी. भोसले यांनी दिली. दरम्यान, संबंधित खातेदाराने वेळीच भरणा न केल्यास डिजीटल फ्लेक्स बोर्डवर त्या थकीत बाकीदारांची नावे झळकविण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली खटाव तालुक्यात वसुलीची जोरदार मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेंतर्गत तालुक्यात एका पथकात पाच ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकारी यांचा समावेश असलेली बारा पथके तयार करण्यात आली आहेत. संबंधित गावातील थकीत खातेदारांच्या याद्या तयार करून ग्रामपंचायतीच्या कार्यालयात नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात येणार आहेत. यबाबत संबंधित खातेदाराने वेळीच भरणा न केल्यास वर्दळीच्या ठिकाणी, गावातील चौकात, तसेच रहदारीच्या रस्त्यावर डिजीटल फ्लेक्स बोर्डवर त्या थकीत बाकीदारांची नावे झळकवण्यात येणार आहेत. तसेच या नागरिकांना ग्रामपंचायतीकडून देण्यात येणारी प्रत्येक सुविधा नाकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर संबंधितांना देण्यात आलेली नळ कनेक्शन तोडण्यात येणार आहेत. पहिल्या टप्यात त्या नागरिकांना कर मागणी बील, दोन महिन्यांनी रीट बील व त्यानंतर शेवटचा टप्पा म्हणजे जप्ती आदेश देण्यात येणार आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम १२९ नुसार करवसुलीची ही धडक मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचा ठराव प्रत्येक गावच्या ग्रामसभेत करण्यात आला आहे. तालुक्यातील मोजक्याच असलेल्या मोठ्या लोकसंख्येच्या गावात लाखो रूपयांची ग्रामपंचायत कराची रक्कम थकीत आहे.
पुसेगाव, ता. खटाव येथील ग्रामपंचायतीच्यावतीने गत वर्षापासून या मोहीमेला गती मिळाली आहे. गेले वर्षभर दोन कामगार या करवसुलीच्या मोहीमेवर काम करत आहेत. संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन त्याला थकीत रक्कम भरण्यास विनवणी करत आहेत. योग्य प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामसभेत ठराव करून संबंधित खातेदारांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आल्या आहेत. फिरत्या रिक्षाद्वारे लोकांच्यात जनजागृती करण्यात येत आहे. संबंधितांनी अजूनही योग्य प्रतिसाद न दिल्यास कायद्याच्या चाकोरीतून कर वसूल करण्यात येणार आहे. थकीत खातेदारांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत सदस्याकडे सादर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ते सदस्य आपापल्या वार्डात नागरिकांनी त्वरित ग्रामपंचायतीचा कर भरण्यासाठी लोकांची मानसिकता तयार करत आहेत. संबंधितांना ग्रामपंचायतीकडून पुरवण्यात येणाऱ्या सुविधा पूर्णपणे थांबविण्यात येणार आहेत. नागरिकांनी कराचा भरणा न केल्याने ग्रामपंचायतीच्याकडून होणाऱ्या अंतिम कारवाईची कटूता टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)