वाठार स्टेशन : महिलांच्या उद्धारासाठी मी फौजदाराची नोकरी सोडली आणि महिलांना वेगवेगळी कामे देऊन त्यांना सक्षम बनवण्याचे स्वप्न बाळगले. बारामती तालुक्यात स्वत:ची कंपनी स्थापन केली. या कंपनीचे सभासद व्हा आणि घरबसल्या व्यवसाय करून पैसा मिळवा, असा सल्ला देत व आगरबत्ती पॅकिंगच्या नावाखाली बारामती तालुक्यातील एका महिलेने कोरेगाव तालुक्यातील देऊर येथील तब्बल चार बचत गटांच्या ४० महिलांना ३० हजारांचा गंडा घातला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, एक महिन्यापूर्वी देऊर ग्रामपंचायत कार्यालयात एका पोत्यात सुट्या आगरबत्त्या घेऊन एक महिला बारामतीहून आली व महिला बचत गटांचा शोध घेतला. शेवटी चार बचत गटांच्या महिलांना आगरबत्ती पॅकिंगचे प्रशिक्षण देण्यात देण्यात आले. यासाठी बचत गटतील सर्व सदस्यांना प्रारंभी २५० रुपयांप्रमाणे सदस्य व प्रशिक्षण फी आकारण्यात आली. त्यानंतर चारही बचत गटांना अगरबत्ती पॅकिंगसाठी सुट्या आगरबत्तीच्या काड्या देण्यात आल्या व या काड्या भरण्यासाठी वेगवेगळी पाकिटे व सर्वात मिळून एक हजाराची पॅकिंग मशीनही देण्यात आली. यासाठी प्रत्येक महिलांकडून ५५० रुपये डिपॉझिट भरून घेण्यात आले व कागदवर तसा करार करण्यात आला. प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला या गटास कच्चा माल देण्यात येइल व पॅकिंग केलेल्या दहा किलो मालास ५०० रुपयांप्रमाणे पेमेंट देण्यात येइल, असे सांगण्यात आले. १० मार्च ही तारीख झाली तरी संबंधित महिला उद्योजक गावाकडे फिरकलीच नसल्याने बचत गटातील महिलांना संशय येऊ लागला. मोबाईल नंबरवर या महिलांनी शोध घेतला; परंतु हा नंबरही बोगस असल्याची खात्री पटली. ज्या गावचा पत्ता या दिला. त्या गावात चौकशी केल्यानंतर गावात अशी संस्थाच नसल्याचे उघड झाल्यामुळे शेवटी बचत गटांच्या महिलांनी आता पोलिसांत या प्रकरणाची माहिती देण्याचा निर्णय घेतला.दरम्यान, याबाबत या महिलांनी वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. संबंधित महिलेस अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)
आगरबत्तीच्या नावाखाली गंडा
By admin | Updated: April 10, 2015 00:23 IST