नायगावला क्रांतिज्योतींचे स्मारक; प्रशिक्षण केंद्राला मंजुरी
By नितीन काळेल | Updated: April 23, 2025 00:46 IST2025-04-23T00:45:51+5:302025-04-23T00:46:13+5:30
घोषणेनंतर साडे तीन महिन्यात निर्णय : मंत्रिमंडळ बैठकीत १४३ कोटींची तरतूद

नायगावला क्रांतिज्योतींचे स्मारक; प्रशिक्षण केंद्राला मंजुरी
सातारा : नायगाव, ता. खंडाळा येथे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मारकासाठी १४२ कोटी ६० लाख आणि महिला प्रशिक्षण केंद्रासाठी ६७ लाख १७ हजार अशाप्रकारे सुमारे १४३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याबाबत मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. घोषणेनंतर अवघ्या साडे तीन महिन्यातच मान्यता मिळाल्याने हे काम लवकरच मार्गी लागणार आहे.
नायगाव येथे ३ जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य आणि शासकीय अधिकारी, ग्रामस्थांच्या उपस्थितीत भव्य सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सावित्रीमाई फुले यांच्यामुळे महिलांना मानाचे स्थान मिळाले आहे. पाच वर्षांनी त्यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष आहे. त्यापूर्वीच नायगावात १० एकर क्षेत्रात भव्य स्मारक उभे राहील. यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी घोषणा केली होती. तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नायगाव दत्तक घेण्याची घोषणा केली होती. यानंतर राजकीय आणि प्रशासकीय पातळीवरही जोरदार हालचाली झाल्या. त्यामुळे मंगळवारच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णयही घेण्यात आला.
नायगाव येथे आता सावित्रीमाई फुले यांचे भव्य स्मारक उभे राहणार आहे. यासाठी जागा लागणार आहे. तसेच महिला प्रशिक्षण केंद्रही उभारले जाणार आहे. याठिकाणी राज्यातील महिला प्रशिक्षण घेणार आहेत. यामुळे सातारा जिल्ह्यातील नायगावचे हे स्मारक आणि प्रशिक्षण केंद्र मार्गदर्शक ठरणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संचालन समिती...
स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्रासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित करण्यासाठी पदनिर्मिती, स्मारक आणि महिला केंद्राच्या व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संचालन समिती गठीत करण्यासही मान्यता देण्यात आलेली आहे.