सुई-दोऱ्याने तोंड शिवून नागाचा छळ
By Admin | Updated: August 7, 2016 22:55 IST2016-08-07T22:55:19+5:302016-08-07T22:55:19+5:30
वाईत अघोरी प्रकार : कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे नागाची सुटका; वनकर्मचाऱ्यांनी तोडले टाके

सुई-दोऱ्याने तोंड शिवून नागाचा छळ
वाई : नागपंचमी सणाला एक वेगळे महत्त्व आहे. या सणाला नागदेवतेची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते. पण काही वेळा उत्सवात या प्राण्यांवर अत्याचार होण्याचे प्रकार घडत असतात. असाच अघोरी प्रकार वाई येथे घडला. नागपंचमीच्या मुहूर्तावर दुधाच्या अभिषेकाने भिजू पाहणारा नाग सर्पमित्रांच्या सतर्कतेमुळे वन विभागाच्या कार्यालयात जाऊन विसावला. सुई-दोऱ्याने नागाचे
तोंड शिवून त्याला टोपलीत बंद करण्यात आले होते. वनविभागाने टाके तोडून नागाचे तोंड मोकळे
केले.
वाई येथील गंगापुरी भागात नागांना दूध पाजण्याच्या निमित्ताने दोन गारुडी महिलांकडून पैसे घेत असल्याची कुणकुण लागताच काही सर्पमित्र तत्काळ घटनास्थळी धावले. त्यांनी बंदिस्त टोपली उघडून बघितली तेव्हा त्यात जिवंत नाग आढळून आला. समोरच्याला चावण्यासाठी तोंड उघडता येऊ नये म्हणून त्याचे तोंड दोन्ही बाजूने शिवण्यात आले होते. हा विकृत प्रकार पाहून कार्यकर्त्यांनी लगेच वनखात्याशी संपर्क साधला. मात्र, ‘यात
विशेष काय?’ अशा अविभार्वात प्रकरण किरकोळीत काढण्याचा
प्रयत्न झाला. तेव्हा कायद्यावर बोट ठेवून सर्पमित्रांनी आक्रमक भूमिका घेतली. तक्रार दाखल केली. अखेर नागांसह गारुड्याला वनअधिकाऱ्यांनी वनविभागाच्या कार्यालयात स्थानबद्ध केले.
अधिवास क्षेत्रात सोडणार..
वाईतील गंगापुरी येथून ताब्यात घेण्यात आलेल्या नागाचे टाके वनविभागाच्या वतीने काढून टाकण्यात आले. सध्या नाग वनविभागाच्या देखरेखीत असून, त्याला लवकरच त्याच्या अधिवास क्षेत्रात सोडणार असल्याची माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली.
कठोर शासन व्हावे !
सुई-दोऱ्याने तोंड शिवून नागाला दूध पाजण्याचा हा अघोरी प्रकार रविवारी नागपंचमीच्या दिवशी उघडकीस आल्याने पर्यायवरणप्रेमी तसेच नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. वन्यप्राण्यांचा अशाप्रकारे छळ करणाऱ्यांवर कठोर शासन व्हावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्यावर अशा प्रकारचे अघोरी प्रकार करू नये. उलट त्यांचे संवर्धन करण्यासाठी सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. आम्ही लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून वाई शहरात आठ फ्लेक्स बोर्ड लावले आहेत. आपण फक्त नागपंचमीला नागाची पूजा न करता वर्ष भर त्याचा आदर करावा व त्याला मारू नये.
- डॉ. प्रशांत सूर्यवंशी, सह्याद्री प्रोटेक्टर्स, वाई