नगरपंचायत कर्मचारी राबतात ‘मामां’च्या घरी!

By Admin | Updated: April 7, 2016 00:03 IST2016-04-06T21:48:43+5:302016-04-07T00:03:08+5:30

विनोद क्षीरसागर यांचा खळबळजनक आरोप : अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी लाखो रुपयांची मागणी; दोनही कॉँग्रेसकडून भ्रमनिरास

Nagar Panchayat employees are staying at home! | नगरपंचायत कर्मचारी राबतात ‘मामां’च्या घरी!

नगरपंचायत कर्मचारी राबतात ‘मामां’च्या घरी!

लोणंद : ‘नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सदस्य आणि राष्ट्रवादीचे पॅनेलप्रमुख आनंदराव शेळके ( मामा) यांच्या घरी घरगडयासारखे राबावे लागते,’ असा खळबळजनक आरोप भाजपचे पॅनेलप्रमुख विनोद क्षीरसागर यांनी छायाचित्रासह पुराव्यासह केला. लोणंद नगरपंचायत स्थापनेचा निर्णय भाजपनेच घेतला असून, त्यासाठी तीन महत्त्वाच्या अटी स्थानिक कार्यकर्त्यांनी घातल्याने नागरिकांनीच ही निवडणूक हाती घेतली असल्याचा दावाही क्षीरसागर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.लोणंद नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी भाजपने १७ पैकी १३ वॉर्डात उमेदवार दिले असून, दोन वॉर्डातील उमेदवार पुरस्कृत केले आहेत उर्वरित चार वॉर्डांतील फैसला शिवसेनेबरोबर युती होणार की नाही, या संभ्रमावस्थेमुळे होऊ शकला नाही, असे क्षीरसागर यांनी सांगितले. लोणंद विकास सोसायटी सर्वपक्षीय पॅनेलने आनंदराव शेळके यांच्या हातून हिसकावून घेतली होती. तो प्रयोग नगरपंचायत निवडणुकीत होऊ शकला नाही, असे त्यांनी नमूद केले.विकास हाच आमचा मुद्दा असेल. दोन्ही नेत्यांकडून (काँग्रेस आणि राष्ट्रवादी) लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. विकासकामे झालीच नाहीत; उलट भ्रष्टाचाराच्या माध्यमातून नेत्यांनी स्वार्थ साधला. राष्ट्रवादीने घरपट्टीत चाळीस टक्के वाढ केली. पाणीपट्टी दीडपट केली, तरी पाणी मिळतच नाही. सगळीकडे घाणीचे साम्राज्य, उघडी गटारे, रोगराई यामुळे लोणंदकर मेटाकुटीला आले आहेत. ग्रामपंचायतीचे कर्मचारी नेत्यांच्या शेतात दारे धरतात. गाड्या धुतात. महिला कर्मचारी घरकाम करतात. विद्यमान नेतृत्वाला विकासाची दृष्टी नाही. ग्रामपंचायतीचे पाणी त्यांच्या उसाला जाते. घरात कुणी नोकरीस नसताना त्यांच्याकडे ‘एक्सयूव्ही’ गाडी कशी येते? झेडपीत चौथी टर्म सुरू असताना दुष्काळी भागात किती कूपनलिका आणल्या, ते त्यांनी सांगावे. मी अल्पकाळात किती कूपनलिका आणल्या, हे जाहीर करतो,’ असे आव्हान देत आरोपांच्या फैरीवर फैरी क्षीरसागर यांनी झाडल्या.
२०१२ मध्ये कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगतात. ‘भाजपमध्ये प्रवेश करताना तीन अटी घातल्या होत्या. नगरपंचायतीची निर्मिती, नीरा-देवघरचे पाणी आणि औद्योगिक वसाहतीत भूमिपुत्रांना स्थान अशा त्या तीन अटी होत. नगरपंचायत तर झाली. आता उर्वरित दोन अटी पूर्ण करून घेऊच,’ असा विश्वास ते व्यक्त करतात. शिवसेनेचे उमेदवार भाजपने पळविल्याचा आरोप ते फेटाळतात. क्षीरसागर यांच्या मते पहिला शत्रू राष्ट्रवादी हाच आहे. चोवीस तास पाणीयोजना, भूमिगत गटार योजना आणि उत्तम अंतर्गत रस्त्यांना भाजप सत्तेत आल्यास प्राधान्य देईल.
‘जिल्ह्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि त्या पक्षाच्या नेतृत्वावर सर्वाधिक प्रेम केले; पण त्यांनी साताऱ्याला काय दिले? धोम-बलकवडीचे पाणी रामराजेंनी फलटणकडे वळविले; मात्र नीरा-देवघरच्या कालव्यांचे काम रखडले आणि ते पाणी खंडाळ्याला मिळण्याऐवजी थेट बारामतीकडे वळविले गेले. अशा पक्षाला धूळ चारण्यासाठी जनताच घराबाहेर पडली असून, भाजपच्या प्रचारात हिरीरीने सहभागी होत आहे,’ असे ते म्हणाले.


ग्रामपंचायतीची सत्ता राष्ट्रवादीच्या हाती आल्यानंतर अवघ्या सातव्या महिन्यात मी राष्ट्रवादी सोडली. कारण सत्ता येऊनही कोणतीच कामे झाली नाहीत. माझ्या वॉर्डातील अनेक कामे मंजूर झाली; पण निधी दिला गेला नाही. त्यामुळे कार्यकर्ते, नागरिक नाराज झाले. याखेरीज, माझ्या कार्यकर्त्यांना बोलावून फोडाफोडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या राजकारणाला कंटाळूनच मी पक्ष सोडला आणि आता भाजपच्या पॅनेलमधून निवडणूक लढवीत आहे.
- चंद्रकांत शेळके,
उमेदवार, भाजप


टपरीधारकांकडून ‘वसुली’ कशाची?
ग्रामपंचायतीतील विद्यमान सत्ताधाऱ्यांनी टपरीधारकांकडून ऐंशी ते शंभर रुपये प्रतिदिन वसुली चालविली आहे, असा आरोप क्षीरसागर यांनी केला. ‘ग्रामपंचायतीला मिळालेले पैसे आणि त्यातून झालेली कामे यांचा हिशोब मागितला असता ते देऊ शकले नाहीत. अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी लाखो रुपये मागितले गेले. तिकिटाची लालूच दाखवूनही पैसे उकळले गेले. भ्रष्टाचाराची परिसीमा राष्ट्रवादीच्या कार्यकाळात गाठली गेली असून, खोटे ठराव जनतेसमोरच नव्हे तर थेट कोर्टात सादर करण्यापर्यंत मजल गेली आहे,’ असे आरोप क्षीरसागर यांनी केले.

'‘टँकर केवढ्याला घेतला..?
लणंदला पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीने टँकर घेतला आहे. त्याची किंमत १२ लाख असल्याचे दाखविण्यात आले आहे. परंतु प्रत्यक्षात तो टँकर जुना आणि मोडका आहे. यासंदर्भात आम्ही सभेत बोललो, पत्रकार परिषदा घेतल्या, वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तक्रारीही केल्या. मात्र, कारवाई केली गेली नाही. जिल्हा परिषदेची यंत्रणा हातात असल्यामुळेच चौकशी आणि कारवाई टाळली गेली,’ असा गौप्यस्फोट क्षीरसागर यांनी केला.


‘बाउन्सर’ची
उपस्थिती आक्षेपार्हच
भाजपच्या एका उमेदवाराच्या प्रचारात बाउन्सरची उपस्थिती होती, असे निदर्शनास आणून दिले असता क्षीरसागर यांनी ही बाब आक्षेपार्हच असल्याचे कबूल केले. संबंधित उमेदवाराला बोलावून घेऊन याबाबत योग्य समज देण्यात आली आहे, असे त्यांनी नमूद केले.

Web Title: Nagar Panchayat employees are staying at home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.