मायलेकींचा अद्याप ठावठिकाणा नाही
By Admin | Updated: May 4, 2015 00:24 IST2015-05-04T00:16:18+5:302015-05-04T00:24:14+5:30
गूढ वाढले : रायगावच्या नावडकर कुटुंबातील तिघींचा शोध सुरूच

मायलेकींचा अद्याप ठावठिकाणा नाही
मेढा : जावळी तालुक्यातील रायगावच्या बेपत्ता कुटुंबातील प्रवीण धनाजी नावडकर यांचा मृतदेह कास भागात आढळल्यानंतर त्यांच्या पत्नी व दोन लहानग्या मुलींचा शोध रविवारीही सुरूच होता. अद्याप त्यांचा ठावठिकाणा न लागल्याने या प्रकरणातील गूढ वाढले आहे. प्रवीण यांच्याजवळ आढळलेल्या चिठ्ठीच्या आधारे कास तलावालगतचा जंगल परिसर पोलिसांनी पिंजून काढला.
रायगाव (ता. जावळी) येथील प्रवीण नावडकर हे आपली पत्नी नूतन तसेच श्रावणी व समृद्धी या दोन मुलींसह दुचाकीवरून (एमएच ११ बीयू ९९२२) २० एप्रिल रोजी काळंगवाडी येथे नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारासाठी म्हणून घराबाहेर पडले होते. मात्र, ते काळंगवाडी येथेही गेले नाहीत आणि परत रायगावलाही आले नाहीत. त्यामुळे प्रवीण यांचे वडील धनाजी यांनी भुर्इंज पोलीस ठाण्यात २१ एप्रिल रोजी चौघेजण बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली होती. गेल्या चार दिवसांपासून कास परिसरात एक दुचाकी बेवारस स्थितीत असल्याचे परिसरातील नागरिकांनी बघितले. ती नावडकर यांची असल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, ‘आम्ही सर्वजण घरगुती कारणावरून आत्महत्या करीत आहोत,’ अशा आशयाची चिठ्ठी दुचाकीजवळ आढळून आली. त्यानुसार कास तलाव व परिसरातील जंगलव्याप्त परिसरात शोध घेतला असता, प्रवीण यांचा मृतदेह शनिवारी (दि. २) सापडला.
रविवारी या परिसरात पोलिसांनी कास ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम राबविली; मात्र प्रवीण यांच्या पत्नी नूतन तसेच श्रावणी, समृद्धी या मुलींचा शोध लागला नाही. त्यामुळे या प्रकरणातील गूढ वाढले आहे. दरम्यान, कास परिसरात जंगली श्वापदांचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याने नावडकर कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रवीण नावडकर यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, व्हिसेरा पुणे येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळणार का? बेपत्ता कुटुंबीयांचा तपास केव्हा लागणार, या साऱ्या अनुत्तरित प्रश्नांमुळे रायगाव परिसर आणि नावडकर कुटुंबीयांवर आघात झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाटील, सहायक फौजदार जगदाळे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)