टेंभूत आत्महत्या केलेल्या मायलेकी रेठरे खुर्दच्या !
By Admin | Updated: April 3, 2016 23:42 IST2016-04-03T22:39:07+5:302016-04-03T23:42:49+5:30
कारण अस्पष्ट : नातेवाईक पोलिस ठाण्यात दाखल

टेंभूत आत्महत्या केलेल्या मायलेकी रेठरे खुर्दच्या !
कऱ्हाड : टेंभू येथे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलेली महिला व मुलगी या दोघी मायलेकी असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. रविवारी रात्री उशिरा त्या दोघींची ओळख पटली असून, त्या कऱ्हाड तालुक्यातीलच रेठरे खुर्दच्या आहेत.
शशिकला जयवंत कारंडे (वय ३८) व शीतल जयवंत कारंडे (१५, दोघी रा. रेठरे खुर्द) अशी त्यांची नावे आहेत. रात्री उशिरा संबंधित महिलेची बहीण पोलिस ठाण्यात आल्यानंतर उलगडा झाला. कऱ्हाड नजीकच्या टेंभू गावात मुळुकाचा बिघा नावाच्या शिवारामध्ये शनिवारी सकाळी एका महिलेसह मुलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याठिकाणी जाऊन पोलिसांनी पाहणी केली. त्यावेळी महिलेची पर्स व कापडाने भरलेली प्रवासी बॅग आढळून आली. पर्समध्ये मोबाईल चार्जर व सातारा ते कऱ्हाड प्रवासाचे तिकीट मिळून आले होते. त्यामुळे संबंधित महिला व मुलगी सातारा परिसरातील असण्याची शक्यता निर्माण झाली होती. तसेच महिलेच्या पायावर सिमेंटचे पांढरे व्रण असल्याने दोघीही बांधकाम मजूर असाव्यात, असाही कयास निर्माण झाला होता. त्या अनुषंगाने रविवारी दिवसभर पोलिस तपास करीत होते. मात्र, उशिरापर्यंत त्यांना कोणतीही ठोस माहिती हाती आली नाही. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक महिला व तिचा मुलगा कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्यात आले. त्यांनी आत्महत्या झालेल्या दोघींची ओळख सांगितली. पोलीस ठाण्यात आलेली महिला ही मृत महिलेची बहीण होती. पोलिसांची खात्री झाल्यानंतर त्यांनी त्यांची नावे दिली. अन्य नातेवाइकांना कळविले आहे. तिच्या माहेरकडील लोकांना बोलवले असून रात्री उशिरापर्यंत ते कऱ्हाडात पोहोचले नव्हते. शशिकला व शीतल या दोघींनी आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नातेवाइकांकडे चौकशी झाल्यानंतर सोमवारी हे कारण समोर येईल, असे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)