कायद्याच्या चौकटीत काम करणे माझे कर्तव्य : पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:28 IST2021-06-05T04:28:23+5:302021-06-05T04:28:23+5:30
महाबळेश्वर : ‘कायदेशीर तरतुदींच्या अधीन राहून काम करणे हे माझे कर्तव्य आहे. नगराध्यक्षांनी बुधवार, दि. २ रोजी सभा आयोजित ...

कायद्याच्या चौकटीत काम करणे माझे कर्तव्य : पाटील
महाबळेश्वर : ‘कायदेशीर तरतुदींच्या अधीन राहून काम करणे हे माझे कर्तव्य आहे. नगराध्यक्षांनी बुधवार, दि. २ रोजी सभा आयोजित केली होती. त्या सभेला उपस्थित होते. त्यानंतर गुरुवारी सभा ही नियमबाह्य असल्याने मी त्या सभेला उपस्थित राहिले नाही. यासंदर्भात मी नगराध्यक्षांना पूर्वकल्पना दिली होती. गुरुवारच्या नियमबाह्य सभेत माझ्यावर टीका झाली. त्याची दखल घेण्याची आवश्यकता वाटत नाही,’ असे मत मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी व्यक्त केले.
महाबळेश्वर येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुख्याधिकारी पल्लवी पाटील म्हणाल्या, ‘पालिकेची बुधवार, दि. २ रोजी आयोजित केलेली सर्वसाधारण सभा ही कोरमअभावी तहकूब करण्यात आली होती. ही सभा तहकूब करण्यात येत नाही ती रद्द्च करावी लागेल, अशी सूचना नगराध्यक्षांना केली. परंतु नगराध्यक्षांनी सूचनेकडे दुर्लक्ष करून सभा तहकूब करून तीच सभा ३ जून रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. नगराध्यक्षांनी घेतलेला हा निर्णय नियमबाह्य होता. त्यामुळे नगराध्यक्षांना पत्र देऊन आपण गुरुवारच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणार नाही कळविले होते. मी कोणत्याही कायदेशीर तरतुदींचा भंग केलेला नाही. भंग कोणी केला असेल तर तो नगराध्यक्षांनी केला आहे. नियमबाह्य सभेला उपस्थित राहणे मला बंधनकारक नाही.’