मसूरकरांना ऐकू येणार ‘गुडमॉर्निंग’ची हाक!
By Admin | Updated: October 6, 2015 00:42 IST2015-10-05T21:46:26+5:302015-10-06T00:42:47+5:30
ग्रामसभेत इशारा : निर्मलग्रामसाठी प्रत्येक कुटुंबाने शौचालय बांधण्याचे आवाहन

मसूरकरांना ऐकू येणार ‘गुडमॉर्निंग’ची हाक!
मसूर : स्वच्छ व निर्मल भारत बनविण्यासाठी प्रथम गावापासून सुरूवात होण्याची गरज आहे. हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी प्रत्येकाने शौचालय बांधण्याची गरज आहे. त्यासाठी शासन अनुदान देते. मसूरमधील शौचालय नसलेल्या सर्व कुटुंबांनी स्वत:चे शौचालय बांधणीसाठी पुढाकार घ्यावा व मसूर निर्मलग्राम करावे, असे आवाहन करून यापुढे उघड्यावर शौचविधी करणाऱ्यांवर गुडमॉर्निंग पथकाव्दारे कारवाई करण्याचा इशारा मसूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत देण्यात आला. मसूर ग्रामपंचायतीच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या ग्रामसभेत निर्मलग्रामचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच रेखा वायदंडे होत्या. यावेळी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे, केंद्रप्रमुख शकुंतला साळुंखे, मुख्याध्यापक दिलीप सावंत, अॅड. रणजितसिंह जगदाळे, ग्रामविकास अधिकारी आर. टी. पवार, ग्रामपंचायत सदस्य सुनील दळवी, संजय शिरतोडे, प्रकाश जाधव, दीपक जगदाळे, फैजल मोमीन, सतीश कदम, वनिता बर्गे, सुनिता मसूरकर, वहिदा मुल्ला, मनीषा जगदाळे, आशा कदम, कृषी सहायक कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. लोखंडे यांनी साथीचे आजार व उपचार याविषयी माहिती दिली. कृषी सहायक अनिता कदम यांनी फळबाग लागवड योजना तसेच उपलब्ध मका बियाण्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
मसूर येथील खासगी दवाखान्यातील डॉक्टर रात्री-अपरात्री रूग्णांना सेवा देत नाहीत, त्यांना समज द्यावी, असे सतीश पाटील यांनी सांगितले. बांधकाम खात्याने गटारे काढावीत. पाणीप्रश्न, उद्यानाचा वापर, अंगणवाडीसाठी जागा द्यावी विषयावर चर्चा झाली.
यावेळी शासकीय परिपत्रके वाचून दाखवून विविध शासकीय लाभार्थींची निवड करण्यात आली. फैजल मोमीन यांनी आभार मानले. (वार्ताहर)
शनिवारचा बाजार सुरू करावा...
संभाजी जगदाळे व सतीश पाटील यांनी बाजारपेठेतील शनिवारचा बाजार कोणी व का बंद केला असा प्रश्न उपस्थित करून तो प्रत्येक शनिवारी भरवण्यात यावा, अशी मागणी केली. तसेच जो कोणी शनिवारी येणार नाही त्या व्यापाऱ्याला बुधवारी बाजारात बसू देऊ नये. यासह कचऱ्याची इतरत्र विल्हेवाट लावावी, असे आवाहन केले.