खाण कामगाराचा खून करून मृतदेह विहिरीत फेकला

By Admin | Updated: January 1, 2017 23:15 IST2017-01-01T23:15:34+5:302017-01-01T23:15:34+5:30

गूढ कायम : वाठार स्टेशनजवळील घटना; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

The murderer murdered the worker and buried the well in the well | खाण कामगाराचा खून करून मृतदेह विहिरीत फेकला

खाण कामगाराचा खून करून मृतदेह विहिरीत फेकला

वाठार स्टेशन : खाण कामगाराचा चार दिवसांपूर्वी खून करून मृतदेह अज्ञाताने विहिरीत फेकल्याची खळबळजनक घटना रविवारी
दुपारी पिंपोडे खुर्द हद्दीत उघडकीस आली. संजय उमाजी राठोड (वय २५, रा. जेऊरवाडी, ता. अक्कलकोट)
असे खून झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संजय राठोड हा तापोळा (ता. महाबळेश्वर) या
ठिकाणी दगड फोडण्याचे काम करत होता. त्याच्यासोबत त्याचा भाऊ, सासू-सासरे व नातेवाईक राहात
होते. तर त्याची पत्नी मुलांच्या शिक्षणासाठी गावीच जेऊरवाडी या ठिकाणी
राहात आहे. तीन दिवस दगड फोडण्याचे काम बंद होते. त्यामुळे बायकोला पैसे पाठविण्यासाठी
संजय गुरुवारी साताऱ्यात आला. मात्र, त्या दिवसांपासून त्याचा काहीच थांगपत्ता नव्हता. दरम्यान, संजय याचा मामा लक्ष्मण राठोड यांना रविवारी एक निनावी फोन आला. त्या व्यक्तीने आपले नाव न सांगता संजय याचा मृतदेह विहिरीत असल्याचे लक्ष्मण राठोड यांना सांगितले. याची माहिती संजय याच्या वडिलांना त्यांनी सांगितली. त्यानंतर वडील व मामा वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात गेले. पोलिसांना या प्रकाराची माहिती दिल्यानंतर पोलिस तत्काळ घटनास्थळी गेले. इतर नागरिकांच्या मदतीने संजयचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. त्याच्या अंगावर सर्वत्र जखमा आढळल्या आहेत. त्यामुळे त्याचा खूनच झाला असल्याची तक्रार वडील उमाजी राठोड यांनी वाठार पोलिस ठाण्यात दिली आहे. (वार्ताहर)

Web Title: The murderer murdered the worker and buried the well in the well