खूनप्रकरणी सिंधी खुर्द येथील एकास जन्मठेप

By Admin | Updated: April 20, 2016 23:22 IST2016-04-20T23:22:41+5:302016-04-20T23:22:41+5:30

चारित्र्याच्या संशयावरून खून

The murder case was registered at Sindhi Khurd | खूनप्रकरणी सिंधी खुर्द येथील एकास जन्मठेप

खूनप्रकरणी सिंधी खुर्द येथील एकास जन्मठेप

वडूज : चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याप्रकरणी सिंंधी खुर्द, ता. माण येथील आरोपी अमोल श्रीरंग जाधव (वय २८) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. गोखले यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
सिंंधी खुर्द, ता. माण येथील पोपट जाधव याचा अमोल जाधव याने दि. २८ जून २०१४ रोजी डोक्यात दगड खून केला. तसेच खून करून पोपट भानुदास जाधव याचा मृतदेह चिडा नावाच्या शिवारातील शेतात पुरला. पोपट भानुदास जाधव हा हरवला असल्याची फिर्याद त्याच्या चुलत भावाने दहिवडी पोलिस ठाण्यात दिली होती. अमोलने पोपटचा खून केल्याचा कबुली जबाब फिर्यादीकडे दिला. त्याच दिवशी दहिवडीचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक समाधान चौरे यांच्यासह एम. जामदार आणि पंच यांच्या समक्ष आरोपीच्या सांगण्यावरून पोपट जाधव याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मात्र तो मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असल्याने ओळखण्यास अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या. मृताच्या हाडाचे नमुने घेऊन त्याची डीएनए तपासणी करून हा मृतदेह पोपट जाधव याचाच असल्याचे सरकारी पक्षाने शाबीत केले.
घटनेस प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता; परंतु परिस्थितीजन्य पुरावा, तपासी अधिकारी यांचे कौशल्य आणि सरकारी वकील नितीन गोडसे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. गोखले यांनी आरोपी अमोल जाधव याने खून करून, पुरावा नष्ट करणे यासाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याचबरोबरीने पाच हजार रूपये दंड केला. दंड न भरल्यास १ वर्षे सक्तमजुरी, पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पाच हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास दोन वर्षे सक्तमजुरी ठोठावली. जिल्हा प्रॉसिक्युशन अधिकारी म्हणून अविनाश पवार यांनी काम पाहिले, तर पोलिस हवालदार राजेंद्र घोरपडे, दत्तात्रय जाधव, तानाजी चंदनशिवे यांनी त्यांना सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: The murder case was registered at Sindhi Khurd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.