खून प्रकरणातील सूत्रधाराचे पलायन
By Admin | Updated: July 19, 2015 00:40 IST2015-07-19T00:36:49+5:302015-07-19T00:40:47+5:30
वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना प्रकार

खून प्रकरणातील सूत्रधाराचे पलायन
सातारा : आरळे (ता. सातारा) येथील बजरंग जगन्नाथ गायकवाड (वय ३१) याचा खून केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या अक्षय लालासो पवार (२०, रा. खंडोबाचा माळ, सातारा) या संशयित मुख्य सूत्रधाराने शनिवारी दुपारी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले. या घटनेमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली असून, आरोपी अक्षय पवारचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून बजरंग गायकवाड याचे दि. २६ मार्चला गावातून अपहरण करण्यात आले होते. त्याचा तपास करताना भयानक क्रौर्य समोर आले होते. बजरंगला अंभेरी घाटात नेऊन दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर साताऱ्यात आणून एका खोलीत कोंडून ठेवण्यात आले होते. तेथेच त्याचा मृत्यू झाला होता. हे लक्षात येताच आरोपींनी मृतदेह अंभेरी घाटात नेऊन जाळला होता.
याप्रकरणी पोलिसांनी वासुदेव शिवाजी जांभळे (२२, रा. रहिमतपूर), आकाश शरद सोनटक्के (२८, रा. बारावकरनगर, सातारा), राजेंद्र ऊर्फ वैभव रामराव पवार (४५, रा. खेड, ता. सातारा) यांना अटक केली होती. मात्र, या घटनेपासून मुख्य सूत्रधार अक्षय पवार हा फरार होता. शनिवारी तो कोरेगाव तालुक्यातील डोळेगाव येथील एका पोल्ट्री फार्मवर आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पोलीस तेथे तत्काळ पोहोचले. त्याला ताब्यात घेऊन साताऱ्यात आणले. दुपारी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीचे कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करण्यात येत होते. याचवेळी अक्षयने पोलिसांच्या हाताला हिसका देऊन रुग्णालयातून धूम ठोकली. त्याच्या पाठोपाठ पोलीस धावत सुटले; मात्र तो सापडला नाही. खून प्रकरणातील आरोपी रुग्णालयातून पळाल्याचे समजताच जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीच्या शोधासाठी दोन पथके तयार करून विविध ठिकाणी रवाना केली. रात्री उशिरापर्यंत अक्षयचा पोलीस शोध घेत होते. (प्रतिनिधी)