निरीक्षकांसह पाच पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल

By Admin | Updated: June 21, 2016 01:20 IST2016-06-21T01:14:18+5:302016-06-21T01:20:23+5:30

संशयित मृत्यू प्रकरण : मेहुण्याची फिर्याद; पंचवीस लाख मागितल्याचा आरोप; न्यायासाठी अखिल भारतीय वडार समाजाचा कऱ्हाडला मोर्चा

Murder case against five policemen including inspectors | निरीक्षकांसह पाच पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल

निरीक्षकांसह पाच पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल

\कऱ्हाड : पोलिसांच्या ताब्यातील संशयिताच्या मृत्यूप्रकरणी अखेर कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात निरीक्षक विकास धस, सहायक निरीक्षक हणमंत काकंडकी यांच्यासह पाच कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संशयितांकडे पंचवीस लाख रुपये मागितल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
याबाबत मृत रावसाहेब जाधवचा मेहुणा हिराजी ऊर्फ अनिल दशरथ डिकोळे (रा. घोटी, ता. करमाळा) याने फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, दि. १७ जून रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हिराजी ऊर्फ अनिल हा घरी असताना त्याचे दाजी रावसाहेब जाधव हे त्याच्याकडे आले. ‘मला पोलिस पकडायला आले आहेत, आपण दोघे दुचाकीवरून कोठे तरी जाऊ,’ असे म्हणून त्यांनी अनिलला सोबत घेतले. त्यानंतर हे दोघेही दुचाकीवरून (एमएच ४५ वाय ३४००) केम रोडच्या दिशेने गेले. त्यावेळी पाठीमागून आलेली कार अचानक दुचाकीसमोर येऊन थांबली. त्यातून चौघेजण खाली उतरले. त्यांनी रावसाहेब व अनिल या दोघांना कारमध्ये घेतले. त्यानंतर कार केम, रोपळे, कुर्डुवाडी, शेटफळ चौक मार्गे पंढरपूरमध्ये नेण्यात आली. त्याठिकाणी आणखी एक कार आली. रावसाहेब व अनिल यांना त्या कारमध्ये बसविण्यात आले. त्यानंतर कार कऱ्हाडच्या दिशेने निघाली. रस्त्यात कारमध्येच पोलिसांनी या दोघांना मारहाण केली. तसेच ‘पंचवीस लाख रूपये द्या, लगेच सोडतो,’ असेही सांगितले. पैसे देण्यास रावसाहेब यांनी नकार दिल्यानंतर त्यांना पुन्हा मारहाण करण्यात आली. त्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास या दोघांना कऱ्हाड येथील कार्वेनाका पोलिस चौकीत आणण्यात आले.
कार्वेनाका पोलिस चौकीत आल्यानंतर सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पोलिस निरीक्षक विकास धस व सहायक पोलिस निरीक्षक हणमंत काकंडकी त्याठिकाणी आले. त्यांनी या दोघांना हातपाय बांधून काठी व पट्ट्याने मारहाण केली. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत मारहाण सुरूच होती. त्यानंतर धस व काकंडकी तेथून निघून गेले. दोन पोलिस कर्मचारी मात्र त्याचठिकाणी थांबून होते. शनिवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास रावसाहेब जाधव यांना त्रास होऊ लागला; मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. सकाळी साडेनऊच्या सुमारास पुन्हा विकास धस व हणमंत काकंडकी यांनी त्याठिकाणी येऊन रावसाहेब जाधव यांना मारहाण केली. त्यावेळी ते बेशुद्ध पडले. विकास धस यांनी जाधव हा जिवंत आहेत का याची खात्रीही केली. त्यानंतर अनिलला शासकीय जीपमधून कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेत नेले. सायंकाळी सहाच्या सुमारास त्याला सिटी मेडिकल सेंटरमध्ये नेऊन त्याच्यावर उपचार केले. तसेच रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास सह्याद्री रुग्णालयात नेऊन रावसाहेब जाधव यांचा मृतदेह दाखविण्यात आला.

Web Title: Murder case against five policemen including inspectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.