कऱ्हाडला पालिकाच करणार गणेश मूर्तींचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:44 IST2021-09-12T04:44:20+5:302021-09-12T04:44:20+5:30
कऱ्हाड : कऱ्हाड शहरात कोठे उत्साहात, तर कोठे उत्साहाला आवर घालत गणरायाचे आगमन झाले; पण गणेश मूर्ती आणण्यासाठी नागरिकांनी ...

कऱ्हाडला पालिकाच करणार गणेश मूर्तींचे विसर्जन
कऱ्हाड : कऱ्हाड शहरात कोठे उत्साहात, तर कोठे उत्साहाला आवर घालत गणरायाचे आगमन झाले; पण गणेश मूर्ती आणण्यासाठी नागरिकांनी केलेली गर्दी चिंतेची बाब बनली आहे. गणेश मूर्ती आणायला नागरिक स्वतः गेले असले तरी मूर्तीचे विसर्जन पालिका करणार आहे. त्याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यास पालिका प्रशासन व्यस्त आहे.
कोरोनामुळे उद्योग व्यवसायांबरोबरच धार्मिक कार्यक्रमांनाही फटका बसला आहे. मंदिरे बंदच आहेत. याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच गणेशोत्सव सुरू झाला. येथे गर्दी करून तिसऱ्या लाटेला निमंत्रण मिळू नये, अशी प्रशासनाची भूमिका आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवालाही अनेक मर्यादा घातल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवाला मिरवणूक काढायला परवानगी दिलेली नाही.
गणरायाचे शुक्रवारी आगमन झाले. त्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. अशीच गर्दी विसर्जनावेळी होऊ नये म्हणून कऱ्हाड पालिका प्रशासन व पोलीस दक्ष झाले आहेत. त्यांच्याकडून उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पालिका नागरिकांच्या गणेशमूर्ती विसर्जनादिवशी स्वतः वाहनातून बरोबर येऊन मूर्ती संकलित करणार आहेत. पालिका कर्मचारी त्याचे विसर्जन करणार आहेत.
चौकट
तीस हजार मूर्तींचा प्रशासनावर ताण
कऱ्हाड शहरात सार्वजनिक व घरगुती गणपतींची संख्या बघितली, तर तीस हजाराच्या घरात पोहोचते. या सगळ्या मूर्तींचे विसर्जन लोकांच्या भावना न दुखावता व्यवस्थित करणे हे प्रशासनाचे काम आहे. त्याचा ताण निश्चितच पालिका प्रशासनावर पडणार आहे.
चौकट
पंधरा ठिकाणी जलकुंभ
घरगुती गणपतींचे विसर्जन करणे सुलभ व्हावे, यासाठी पालिका प्रशासनाकडून पंधरा ठिकाणी जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. सोमवार पेठेत भैरोबा गल्ली, मंगळवार पेठेत कृष्णा नाका, शुक्रवार पेठेत पी. डी. पाटील पाणीपुरवठा संस्था, रंगार वेस चौक, विठ्ठल चौक. शनिवार पेठेत कोयनेश्वर मंदिराजवळ, दैत्यनिवारणी मंदिराजवळ, शाहू चौक, कोल्हापूर नाका, कार्वे नाका, वाढीव भागात पी. डी. पाटील उद्यान, दौलत कॉलनी, पोस्टल कॉलनी. कन्याशाळा चौकात शिवाजी हौसिंग सोसायटी या ठिकाणी हे जलकुंभ उभारण्यात येणार आहेत.
चौकट
प्रदूषण टाळण्याचीही जबाबदारी
कृष्णा नदी पात्रात गणेशमूर्तींचे विसर्जन केल्याने पाणी प्रदूषण होते. हे प्रदूषण टाळण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे शक्य त्यांनी घरच्या घरीच मूर्तींचे विसर्जन करणे गरजेचे आहे. पालिकेने उभारलेल्या जलकुंभाचाही उपयोग होऊ शकतो.
कोट
कोरोना महामारी संकट सुरू आहे. अशावेळी लोकांनी अनावश्यक गर्दी टाळली पाहिजे. मात्र गणेशोत्सवामुळे ही गर्दी वाढण्याची शक्यता आहे. ती टाळण्यासाठी पालिकेने उपाययोजना आखल्या आहेत. त्याला नागरिकांनी सहकार्य करायला हवे. कऱ्हाड नागरिक सूज्ञ आहेत ते सहकार्य करतील.’
- रमाकांत डाके,
मुख्याधिकारी, कऱ्हाड