पालिकेच्या लढवय्यांनी... कोरोनालाही हरवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:41 IST2021-05-11T04:41:50+5:302021-05-11T04:41:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार म्हटलं की पूर्वी दरदरून घाम फुटायचा.. आपल्याला कोरोना झाला तर काय ...

Municipal fighters ... defeated Corona too | पालिकेच्या लढवय्यांनी... कोरोनालाही हरवले

पालिकेच्या लढवय्यांनी... कोरोनालाही हरवले

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार म्हटलं की पूर्वी दरदरून घाम फुटायचा.. आपल्याला कोरोना झाला तर काय होईल.. आपल्या कुटुंबाचं काय होईल.. ही काळजी कर्मचाऱ्यांना स्वस्थच बसू देत नव्हती. मात्र, ते डगमगले नाहीत. संकट गंभीर असूनही प्रशासन या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळेच पालिकेच्या ‘कोरोना फायटर्स’ने वर्षभरात २ हजार ३२५ मृतांवर अंत्यसंस्कार केले. विशेष म्हणजे अंत्यसंस्कार पथकातील एकाही कर्मचाऱ्याला वर्षभरात कोरोनाची लागण झालेली नाही.

कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णावर साताऱ्यातील संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. जिल्हा प्रशासनाने ही जबाबदारी सातारा पालिकेच्या खांद्यावर सोपवली आहे. अंत्यसंस्काराचे काम अत्यंत जोखमीचे असूनही पालिकेचे कोरोना फायटर्स गेल्या वर्षभरापासून हे काम जबाबदारीने करत आहेत. मृतदेह कसा हाताळावा, सुरक्षित अंत्यसंस्कार कसे करावेत, अंत्यसंस्कारानंतर काय? काळजी घ्यावी आदींचे पुरेपूर प्रशिक्षण या कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये सुरुवातीचे काही दिवस प्रचंड भीती होती. अनेकांच्या घरात लहान मुले आहेत. त्यामुळे कोरोनाची लागण झाल्यास आपलं व कुटुंबाचं काय? या प्रश्नाने अनेकांची झोपच उडविली होती. मात्र, पालिका प्रशासन कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.

प्रत्येक कर्मचाऱ्याच्या सुरक्षेची प्रशासनाकडून पुरेपूर काळजी घेण्यात आली. त्यांना वेळोवेळी सुरक्षेची साधने पुरविण्यात आली. तुम्हाला काहीही होणार नाही, असा विश्वास त्यांच्यात निर्माण करण्यात आला. कर्मचारीही स्वतःसह कुटुंबाची काळजी घेऊ लागले. त्यामुळेच की काय वर्षभरात २ हजार ३२५ कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करूनही अंत्यसंस्कार पथकातील एकाही कर्मचाऱ्याला कोरोनाने साधी हुलकावणीही दिलेली नाही. सध्याच्या घडीला दररोज ४० ते ५० मृतांवर पालिकेचे पथक अंत्यसंस्कार करत आहे. हे काम अत्यंत जोखमीचे आहे तरीदेखील कर्मचाऱ्यांचा कोरोनाविरुद्धचा लढा धीरोदात्तपणे सुरूच आहे.

(पॉइंटर)

पालिकेने आजवर केलेले अंत्यसंस्कार

सातारा हद्दीतील हिंदू २५८

सातारा हद्दीतील मुस्लिम ३९

ख्रिश्चन समाज १

सातारा हद्दीबाहेरील हिंदू १८९९

सातारा हद्दीबाहेरील मुस्लिम ८९

जिल्ह्याबाहेरील हिंदू ३६

जिल्ह्याबाहेरील मुस्लिम ३

एकूण अंत्यसंस्कार २३२५

(पॉइंटर)

१. सातारा पालिकेने अंत्यसंस्कारासाठी सतरा कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले आहे.

२. हे पथक सकाळ, संध्याकाळ व रात्र अशा तीन टप्प्यांत अंत्यसंस्काराचे काम करते

३. रुग्णवाहिकेतून मृतदेह स्मशानभूमीत आणणे, सरण रचणे, अंत्यसंस्कार, निर्जंतुकीकरण, सावडणे विधी अशा प्रत्येक कामाची जबाबदारी या पथकाला वाटून देण्यात आली आहे.

४. मुस्लिम समाजातील मृत व्यक्ती अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे.

५.अंत्यसंस्काराचा संपूर्ण खर्च पालिकेकडून केला जातो.

(चौकट)

असे आहे पथक..

अंत्यसंस्काराच्या पथकामध्ये २ सुपरवायझर, १ मुकादम निर्जंतुकीकरणासाठी ४ कर्मचारी, सावडणे विधीसाठी ७ कर्मचारी तर शववाहिका व अग्निशमनच्या गाडीवर ३ चालक अशा १७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या गृहविलगीकरणात रुग्ण दगावण्याचे प्रमाणही वाढले आहे. असे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी १ शववाहिका व २ कर्मचाऱ्यांचे पथक कार्यरत आहे.

(कोट)

खरंतर अंत्यसंस्कार करताना आमचा ऊर भरून येतो. पूर्वी थोडी भीतीदेखील वाटत होती. आता मात्र सवय झाली आहे. कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करून आम्ही त्यांच्या नातेवाईकांची भूमिका बजावत आहोत, यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते.

- कपिल मट्टू, आरोग्य कर्मचारी

*फोटो मेल.

Web Title: Municipal fighters ... defeated Corona too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.