साताऱ्यात पालिकेची निर्जंतुकीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:34 IST2021-05-03T04:34:26+5:302021-05-03T04:34:26+5:30
सातारा : जिल्ह्यासह शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने, प्रशासनाची डोकेदुखी वाढू लागली आहे. मात्र, जिल्हा प्रशासन व पालिकेची ...

साताऱ्यात पालिकेची निर्जंतुकीकरण मोहीम
सातारा : जिल्ह्यासह शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने, प्रशासनाची डोकेदुखी वाढू लागली आहे. मात्र, जिल्हा प्रशासन व पालिकेची आरोग्य यंत्रणा कोरोनाला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सातारा पालिकेने शहरात निर्जंतुकीकरण मोहीम हाती घेतली असून, प्रत्येक प्रभागात ही मोहीम प्रभावीपणे राबविली जाईल, अशी माहिती उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिली.
जिल्ह्यासह सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने उपाययोजनांची तीव्रता वाढविली आहे. गतवर्षी संपूर्ण शहर सोडियम हायपोक्लोराइडद्वारे निर्जंतुक करण्यात आले होते. आताही पालिकेने ही मोहीम हाती घेतली असून, यासाठी दोन टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे.
ज्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे त्या परिसरातही सर्व इमारती, दुकाने खिडक्या, लोखंडी रेलिंग, शटर सर्वकाही निर्जंतुक केले जात आहे. निर्जंतुकीकरण मोहिमेस प्रभाग एक मधून सुरुवात झाली असून, टप्प्याटप्प्याने सर्व प्रभागात ही मोहीम राबविली जाणार आहे. याचबरोबर फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणीही केली जात आहे, अशी माहिती उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिली.
फोटो : ०२ मनोज शेंडे
उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्या उपस्थितीत सातारा शहरात निर्जंतुकीकरण मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.