लक्ष्मीटेकडीत पालिकेची स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:16 IST2021-02-05T09:16:59+5:302021-02-05T09:16:59+5:30
सातारा : लक्ष्मीटेकडी परिसरात चिकुनगुन्यासदृश रुग्ण आढळून आल्याने सोमवारी पालिकेच्या आरोग्य पथकाकडून येथे तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कर्मचाऱ्यांनी ...

लक्ष्मीटेकडीत पालिकेची स्वच्छता मोहीम
सातारा : लक्ष्मीटेकडी परिसरात चिकुनगुन्यासदृश रुग्ण आढळून आल्याने सोमवारी पालिकेच्या आरोग्य पथकाकडून येथे तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी जंतुनाशक औषधांची फवारणी करून गटारांची स्वच्छता केली.
सदर बझार येथील लक्ष्मीटेकडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून चिकुनगुन्यासदृश रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. येथील अनेक नागरिक तीव्र सांधेदुखी, थकवा, ताप अशा आजारांनीग्रस्त आहेत. आतापर्यंत सुमारे ३५० नागरिकांमध्ये अशी लक्षणे आढळून आल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. उघड्यावरून वाहणारे सांडपाणी, उघडी गटारे, अस्वच्छता आदींमुळे या परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, त्यामुळेच येथे चिकुनगुन्यासदृश रुग्ण आढळून येऊ लागले आहेत.
या परिस्थितीबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच पालिकेच्या आरोग्य विभागाने सोमवारी लक्ष्मीटेकडी परिसरात तातडीने स्वच्छता मोहीम राबविली. येथील घरांचा परिसर स्वच्छ करण्यात आला. कचऱ्याने तुडुंब भरलेली गटारे कचरामुक्त करून ठिकठिकाणी औषध फवारणी करण्यात आली. ही मोहीम पुढील काही दिवस सुरू ठेवावी, अशी अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
(चौकट)
गृहभेटीद्वारे तपासणी करावी
लक्ष्मीटेकडी, सदर बझार हा परिसर दाट लोकवस्तीचा असल्याने येथे एखादी साथ पसरल्यास तिचे वेगाने संक्रमण होते. कोरोना काळात पालिकेला याची प्रचिती आली आहे. त्यामुळे पालिकेने गृहभेटी देऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करणे गरजेचे बनले आहे.
फोटो : ०२ जावेद ०२/०६
सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाने सोमवारी सकाळी लक्ष्मीटेकडी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्याबरोबरच ठिकठिकाणी औषध फवारणी केली. (छाया : जावेद खान)