मुंबई-पुण्याने वाढविली जिल्ह्याची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:40 IST2021-04-01T04:40:49+5:302021-04-01T04:40:49+5:30
सातारा : कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून भीतीपोटी लोक मुंबई-पुण्याहून गावी येऊ लागले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्याची चिंता ...

मुंबई-पुण्याने वाढविली जिल्ह्याची चिंता
सातारा : कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून भीतीपोटी लोक मुंबई-पुण्याहून गावी येऊ लागले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्याची चिंता अधिकच वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्यभरात कोरोनाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केल्यानंतर नोकरदार आणि चाकरमानी पुन्हा आपल्या गावी येऊ लागले आहेत. त्यातच लॉकडाऊनची शक्यता असल्याने मोलमजुरी करणारे लोक आणखीनच धास्तावले आहेत. गतवर्षीसारखी आपली दयनीय अवस्था होऊ नये म्हणून अगोदरच लोक भीतीने गावी येऊ लागले आहेत. मुंबई, पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण सर्वाधिक आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सध्या येणाऱ्या लक्झरी बस, एस.टी. महामंडळ आणि खासगी गाड्या हाऊसफुल्ल होऊन येत आहेत. मात्र या गाड्यांची तपासणी पूर्वीसारखी होत नसून पोलीस वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहत आहेत. गाडीमध्ये सोशल डिस्टंसिंग तर नाहीच; शिवाय अनेक प्रवासी तोंडाला मास्क न लावताच प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रवाशांवर पोलिसांकडून तत्परतेने कारवाई मात्र करण्यात येत आहे. सातारा बसस्थानकामध्ये तर प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. एस.टी.मध्ये बसण्यासाठी प्रवाशांची अक्षरशः चढाओढ होत आहे. तुडुंब गर्दी होत असल्याने कोरोना कसा आटोक्यात येणार, असा प्रश्न ही गर्दी पाहून अनेकांना पडतो आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. मुंबई-पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण करणे गरजेचे असल्याचे मतही वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून व्यक्त होऊ लागली आहे.
.............................
चौकट : बाहेरगावाहून येणाऱ्याची चाचणीच नाही
गतवर्षीसारखी बाहेरून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकाची चाचणी करणे आवश्यक आहे. मात्र यंदा अशी चाचणी केली जात नसल्याचे दिसून येत आहे. अनेकजण विनाचाचणीचे जिल्ह्यामध्ये प्रवेश करीत आहेत. त्यामुळे कोरोनाचा अधिक मोठ्या प्रमाणात फैलाव होण्याची शक्यता आहे. काही जुजबी उपाययोजना केल्या तर लॉकडाऊनची प्रशासनाला गरज भासणार नाही. त्यामुळे पुणे, मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांची गतवर्षीसारखी चाचणी करणे आवश्यक आहे किंवा अशा प्रवाशांची यादी तयार करून त्यांना होम क्वारंटाईन करण्यास भाग पाडावे तरच कोरोना आटोक्यात येईल.
चौकट : एस.टी. बस
सातारा बसस्थानकामध्ये रोज पाच हजारांहून अधिक प्रवासी ये-जा करीत असतात. पुण्याला दर अर्ध्या तासाला बस सुरू आहेत. तसेच मुंबई, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांतही बस सुरू आहेत. प्रवाशांची कसलीही चाचणी केली जात नाही. शिवाय अनेकजणांनी तोंडाला मास्कही लावलेला नसतो; त्यामुळे खरे तर या गर्दीच्या ठिकाणी कडक नियम अवलंबणे गरजेचे आहे. साध्या वेशातील पोलिसांची पथके तैनात करून बसस्थानकामध्ये विनामास्क दिसल्यास ५०० रुपयांची दंडात्मक पावती केली जावी; तरच या बसस्थानकातील नियमांची जरब बसेल.
चौकट : ट्रॅव्हल्स
मुंबईहून सातारा जिल्ह्यात येणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या पाचशेच्या घरात आहे. रोज रात्री या ट्रॅव्हल्स मुंबईहून सातारा जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. गतवर्षी लॉकडाऊनच्या वेळी लोक ट्रॅव्हल्स भरून गावी येत होते. हीच परिस्थिती आता सुरू होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आत्ताच सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. ट्रॅव्हल्स तपासणीची जिल्ह्यात कोणतीच सुविधा नाही. त्यामुळे नेमक्या किती ट्रॅव्हल्स रोज येतात आणि मुंबई-पुण्याला जातात, याचा आकडा प्रशासनाकडे नाही. त्यांच्याकडे केवळ जुजबी माहिती आहे.
चौकट : रेल्वे
सातारा रेल्वे स्थानकावर साताऱ्यातून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अत्यंत कमी आहे. हे रेल्वे स्टेशन साताऱ्यापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असल्यामुळे फारसे कोणी रेल्वेने प्रवास करीत नाही. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर बसस्थानकाएवढी गर्दी पाहायला मिळत नाही. साताऱ्याहून रोज जेमतेम वीस ते पंचवीस प्रवासी रेल्वेने ये-जा करीत असतात. रेल्वे स्टेशनवर विविध प्रकारचे सूचनाफलक लिहिण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवासी कोरोनाचे नियम पाळत असून तोंडाला मास्क लावूनच ते ये-जा करीत असल्याचे दिसून येत आहे.
चौकट : अशी आहे आकडेवारी
कोरोनाचे एकूण रुग्ण
६५५४२
बरे झालेले रुग्ण
६०२१७
उपचार सुरू असणारे रुग्ण
३४१९
कोरोनाचे एकूण बळी
१९०६