महावितरणच्या महसुली तुटीमध्ये दिवसेंदिवस वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:18 IST2021-02-05T09:18:58+5:302021-02-05T09:18:58+5:30
सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहक नियमित वीजबिलांचा भरणा करीत असल्याने तसेच बिलिंग सायकलमुळे एरवी ...

महावितरणच्या महसुली तुटीमध्ये दिवसेंदिवस वाढ
सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहक नियमित वीजबिलांचा भरणा करीत असल्याने तसेच बिलिंग सायकलमुळे एरवी दरमहा २ ते ४ कोटी रुपयांची थकबाकी दिसून येत होती. मात्र हीच थकबाकी तब्बल १४८ कोटी १३ लाख रुपयांवर गेली असल्याने महावितरणच्या महसुली तुटीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
कोरोनाच्या गेल्या १० महिन्यांच्या कालावधीत सातारा जिल्ह्यातील महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांकडे वीजबिलांची थकबाकी तब्बल १४४ कोटी ९४ लाखांनी वाढली आहे. सातारा जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीमध्ये सुमारे ७ लाख २२ हजार ग्राहक आहेत. मार्च २०१९ मध्ये ६५ हजार ९७० घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे केवळ ३ कोटी १९ लाख रुपयांची थकबाकी होती. मार्च २०२० मध्ये १ लाख ६६ हजार वीजग्राहकांकडे २१ कोटी ६९ लाखांची थकबाकी होती.
मात्र केवळ वीजबिलांच्या वसुलीवर आर्थिक भिस्त असणाऱ्या महावितरणची स्थिती वीजखरेदी, दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च, कर्जांचे हप्ते, कंत्राटदारांची देणी, आस्थापनांचा खर्च भागविण्याइतपत सध्या राहिलेली नाही. त्यामुळे थकबाकीदारांना नियमाप्रमाणे नोटीस पाठवून नाईलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई सुरू करण्यात येत आहे.
खासगीकरणाला चालना देणाऱ्या देशव्यापी धोरणात्मक बदलांमध्ये महावितरणचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे सध्या सवलतीच्या रास्त दराने वीजपुरवठा सुरू असलेल्या शेतकरी, घरगुती ग्राहक, यंत्रमागधारक, छोटे व्यावसायिकांना सर्वाधिक फटका बसणार आहे.
कोरोनामुळे थकबाकीचे ओझे वाढल्याने आर्थिक स्थिती सध्या अतिशय हलाकीची झाली आहे. त्याचप्रमाणे वीजग्राहकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून चालू वीजबिल तसेच थकबाकीची रक्कम भरण्यासाठी हप्त्यांची सोय करून देण्यात आली आहे. वीजबिलांच्या तक्रारी असल्यास त्यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.
चौकट
जिल्ह्यामध्ये घरगुती, वाणिज्यिक औद्योगिक वर्गवारीतील ३ लाख २२ हजार वीजग्राहकांकडे तब्बल १४८ कोटी १३ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. यात सर्वाधिक घरगुती २ लाख ८१ हजार ८३० ग्राहकांकडे ९९ कोटी ८५ लाख, वाणिज्यिक ३१ हजार ९०० ग्राहकांकडे ३२ कोटी ९२ लाख, तर औद्योगिक ४ हजार ३९० ग्राहकांकडे १५ कोटी ३६ लाख रुपयांची थकबाकी आहे. गेल्या डिसेंबर २०२० पर्यंत तब्बल १४५ कोटींच्या थकबाकीचा डोंगर वाढला, तरीही महावितरणने कोणत्याही थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला नाही.
कोट
ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांची रात्रं-दिवस अविरत धडपड सुरू असते, त्यांनाच महावितरणच्या अस्तित्वासाठी नाईलाजाने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई करावी लागणार आहे. वीजग्राहकांनी सहकार्य करून थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करावा.
- गौतुक गायकवाड, अधीक्षक अभियंता, महावितरण