‘महावितरण’चा कृषीसह घरगुती ग्राहकांना शॉक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:44 IST2021-08-14T04:44:32+5:302021-08-14T04:44:32+5:30
औंध : कोरोनाकाळात जोखीम पत्करून अखंडित वीजपुरवठा करूनही वीज ग्राहकांनी थकबाकीसह चालू वीज बिल भरण्यास चालढकल केल्याने ‘महावितरण’ची आर्थिक ...

‘महावितरण’चा कृषीसह घरगुती ग्राहकांना शॉक !
औंध : कोरोनाकाळात जोखीम पत्करून अखंडित वीजपुरवठा करूनही वीज ग्राहकांनी थकबाकीसह चालू वीज बिल भरण्यास चालढकल केल्याने ‘महावितरण’ची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. परिणामी ‘महावितरण’ने कृषिपंपासह सर्वच वर्गवारीतील ग्राहकांना शेवटचा अल्टिमेटम देत वीज बिल भरण्याचे आवाहन केले असून, वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्याचे आदेश मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी दिल्याची माहिती औंधचे उपकार्यकारी अभियंता सुभाष घाटोळ यांनी दिली.
औंध मंडलात घरगुती व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांचे ८७ लाख रुपये एवढी थकबाकी असून, कृषी पंप थकबाकी शासननिर्णयाप्रमाणे ५० टक्के सवलती व्यतिरिक्त ४२१३ ग्राहकांची थकबाकी रक्कम ९ कोटी २० लाखांच्या आसपास आहे.
घाटोळ यांनी सांगितले की, कृषी पंपाचे वीजबिल माफीच्या एवढ्या चांगल्या महत्त्वाकांक्षी योजनेची माहिती सर्वांना ग्रामपंचायत स्तरावर देण्यात आलेली असूनही एकूण ५७५१ ग्राहकांपैकी फक्त १५३८ ग्राहकांनीच या वीजबिल माफी सवलतीचा फायदा घेतलेला आहे. या वीजबिल माफी योजनेचा फायदा न घेतलेल्या वीजग्राहकांना महावितरणतर्फे त्वरित योजनेचा फायदा घेऊन सहकार्य करावे, कारण याच उपलब्ध होणाऱ्या पैशांमधून त्याच ठिकाणी पायाभूत सुविधा पुरवणेकामी निधी उपलब्ध होणार आहे. जेणेकरून भागातील वीजसमस्या सोडविण्यास मदत होईल.
थकबाकी वसूल करण्यासाठी ‘महावितरण’ने विविध पथके स्थापन केली असून, सुटीच्या दिवशीही वसुली मोहीम सुरू राहणार असल्याने वीजबिल भरणा केंद्रेही सुरू ठेवली जाणार आहेत. ग्राहकांनी गैरसोय टाळण्यासाठी वीजबिलांचा तातडीने भरणा करावा, असे आवाहन महावितरण औंध यांच्याकडून करण्यात आले आहे.