महामार्गावरील अडचणींचा खासदार पाटील यांनी वाचला पाढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:38 IST2021-03-19T04:38:47+5:302021-03-19T04:38:47+5:30
कराड: पारगाव-खंडाळा येथे नवीन पूल बांधावा, कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील पुलाचे सहापदरीकरण करण्यात यावे, महामार्गावरील असलेल्या पुलावर व पुलाखाली होणारे ...

महामार्गावरील अडचणींचा खासदार पाटील यांनी वाचला पाढा
कराड:
पारगाव-खंडाळा येथे नवीन पूल बांधावा, कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील पुलाचे सहापदरीकरण करण्यात यावे, महामार्गावरील असलेल्या पुलावर व पुलाखाली होणारे अपघात टाळण्यासाठी विद्युतीकरण करावे, खंबाटकी घाट बायपाससाठी सुरू असलेल्या दोन नवीन बोगद्यांच्या कामाला गती द्यावी यासह पुणे ते शेंद्रे महामार्गाचे अपूर्ण कामे लवकर पूर्ण करून त्यात सुधारणा करण्यात यावी, अशा महामार्गाच्या संदर्भातील विविध मागण्या खासदार श्रीनिवास पाटील यांनी गुरुवारी लोकसभेत केल्या. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती खासदार पाटील यांच्या संपर्क कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात श्रीनिवास पाटील यांनी गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुन्हा संसदेत आवाज उठवला. माझ्या सातारा लोकसभा मतदारसंघातील पारगाव या ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी नवीन पूल बांधाण्यात यावा. महामार्गावरील पुलावर व पुलाखाली रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडताना अपघाताच्या घटना घडत आहेत. असे होणारे अपघात टाळण्यासाठी महामार्गावरील आवश्यक त्या ठिकाणी विद्युतीकरण करण्याच्या उपाययोजना राबवाव्यात. तसेच कराड येथील कोल्हापूर नाक्यावर तीन पदरी पूल असल्याने त्याठिकाणी अपघातांच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे प्राधान्याने येथील पुलाचे सहा पदरीकरण करण्यात यावे. याशिवाय पुणे ते शेंद्रेपर्यंतच्या महामार्गाची अवस्था बिकट आहे. या ठिकाणीची कामे अपूर्ण अवस्थेत असून दर्जाहीन झाली आहेत. त्याची सुधारणा करण्यात यावी. खंबाटकी घाट बायपाससाठी दोन बोगदे तयार होत आहेत. मात्र हे काम संथगतीने सुरू असल्याने या बोगद्यांच्या कामाला गती देण्यात यावी, अशा विविध मागण्या त्यांनी केल्या.
खासदार पाटील यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि विविध मागण्या संदर्भात मंत्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले, सातारा जिल्ह्यातील महामार्गाची अपूर्ण कामे येत्या दोन-तीन महिन्यात पूर्ण होऊन जातील. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी बैठक घेऊन जिथे-जिथे अपघातांची ठिकाणे आहेत ते मला कळवावेत. त्यावर त्वरित निर्णय घेतला जाईल. तसेच असे अपघातमुक्त रस्ते करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूयात, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.