दलित कार्यकर्त्यांचे ‘निर्मला’मध्ये आंदोलन
By Admin | Updated: April 20, 2016 23:38 IST2016-04-20T23:38:41+5:302016-04-20T23:38:41+5:30
विद्यार्थ्यास हीन वागणूक दिल्याचा आरोप

दलित कार्यकर्त्यांचे ‘निर्मला’मध्ये आंदोलन
सातारा : झोपडपट्टीत राहणाऱ्या विद्यार्थ्यास हीन वागणूक दिल्याचा आरोप करून दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी येथील निर्मला कॉन्व्हेन्ट शाळेत बुधवारी सुमारे दोन तास आंदोलन केले. शाळा प्रशासन आणि वर्गशिक्षिकेविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, संबंधित मुलाला कोणतीही हीन वागणूक दिली नसल्याचे शाळा प्रशासनाने स्पष्ट केले असून, त्याच्याच वर्तणुकीमुळे अनेक विद्यार्थी आणि पालक त्रस्त असल्याचे सांगितले.
सदर बझार झोपडपट्टीत राहणाऱ्या इयत्ता चौथीतील विद्यार्थ्याला गेली तीन वर्षे बेंचवर न बसवता जमिनीवर बसविले जात असल्याचा आरोप संघटनांनी केला. त्याला वारंवार घरी पाठविण्यात येत असून, पंधरा-पंधरा दिवस शाळेत येऊ दिले जात नाही, असे त्याच्या आईने सांगितले.
आपण त्याला कर्ज काढून शिकवत आहोत; मात्र शाळा प्रशासन आपल्याकडून मुलाच्या चांगल्या वर्तणुकीची हमी विनाकारणच वारंवार लिहून घेत आहे, असे सांगणाऱ्या आईने मुलावर शाळेने केलेले आरोप फेटाळले.
बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास या मुलाच्या आईसमवेत सामाजिक कार्यकर्त्या सुनेत्रा भद्रे, आप्पा तुपे, शरद गायकवाड, नवनाथ शिंदे, अजिंक्य तपासे, सचिन वायदंडे, किशोर गालफाडे, आदिल शेख, मारुती बोभाटे आदी कार्यकर्ते शाळेत आले. वर्गशिक्षिकेवर त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली.
वर्गशिक्षिकेने मुलाची वर्तणूक ठीक नसल्याचे सांगताच, त्याला शाळेतून काढून का टाकले नाही, अशी विचारणा करीत इतरांपेक्षा वेगळी वागणूक एखाद्या विद्यार्थ्याला देण्याचा हक्क शाळेला कुणी दिला, असा जाब विचारला. दरम्यान, आंदोलन सुरू असताना शाळेतील मुलांना घरी सोडण्यात आले. (प्रतिनिधी)
अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
४शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर लिनेट, वर्गशिक्षिका रुसेरिया सिल्वेरा (रोझा) यांच्या विरुद्ध मुलास अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल अॅट्रॉसिटीचा गुन्हा सायंकाळी उशिरा दाखल झाला. शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत मुलाच्या आईने वेळोवेळी शिक्षिकांनी केलेल्या पाणउताऱ्याबद्दल माहिती दिली आहे.
टाळे ठोकण्याचा प्रयत्न
४आंदोलनादरम्यान शाळेला टाळे ठोकण्याचाही कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला; मात्र पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी कार्यकर्त्यांना रोखले. नंतर कार्यकर्ते तक्रार देण्यासाठी शहर पोलिस ठाण्यात गेले. दरम्यान, शाळा प्रशासनाच्या बाजूने असलेले काही पालक कार्यकर्त्यांपाठोपाठ पोलिस ठाण्यात गेले.