आई, तुम्हाला पुन्हा कधीही भेटणार नाही

By Admin | Updated: November 5, 2014 23:30 IST2014-11-05T23:08:09+5:302014-11-05T23:30:56+5:30

‘केबीपी’च्या विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या शिवांजलीचा शेवटचा संवाद : आत्महत्येने जीवघेण्या स्पर्धेची समस्या स्पष्ट

Mother, you will never meet again | आई, तुम्हाला पुन्हा कधीही भेटणार नाही

आई, तुम्हाला पुन्हा कधीही भेटणार नाही

सातारा : येथील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापत्यशास्त्र विभागाची विद्यार्थिनी शिवांजली भोसले हिने बुधवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास वसतिगृहातच पंख्याला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अजूनही स्पष्ट झाले नसले तरी अभ्यासाच्या तणावामुळे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, शिवांजली संभाजी भोसले (वय १८, रा. मडिलगे बुद्रुक, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) ही रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्यशास्त्र विभागात दुसऱ्या वर्षात शिकत आहे. ‘केबीपी’चे मुलींचे वसतिगृह शिवाजी कॉलेज परिसरात असून, शिवांजली वसतिगृहात खोली क्रमांक सतरामध्ये राहत होती. तिची मैत्रीण गावी गेल्यामुळे शिवांजली एकटीच होती. काल, मंगळवारी ती शेजारील खोलीत अभ्यासासाठी गेली होती.
त्यानंतर, सकाळी तिने आईला फोनवरून आत्महत्येचा निर्णय सांगितला. आपल्या मुलीच्या अचानकपणे आलेल्या फोनमुळे घाबरलेल्या आई-वडिलांनी तत्काळ वसतिगृह अधीक्षक मंगल ढमाळ यांना संपर्क साधला आणि संभाषणाची कल्पना दिली. ढमाळ यांनी शिवांजलीच्या खोलीकडे धाव घेतली. शिवांजलीला हाक मारल्यानंतर आतून प्रतिसाद दिला नाही. आतून दरवाजाला कडी लावली होती. ढमाळ यांनी दरवाजालगतच्या एका छिद्रातून कडी काढली आणि आत खोलीत प्रवेश केला, तर शिवांजलीने आपली ओढणी पंख्याला बांधून गळफास घेतला होता. या घटनेनंतर शिवांजलीला तत्काळ रिक्षातून क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे तिचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. (प्रतिनिधी)

आई, तुम्हाला पुन्हा कधीही भेटणार नाही
शिवांजलीचा शेवटचा संवाद : आत्महत्येने जीवघेण्या स्पर्धेची समस्या स्पष्ट
गारगोटी : ‘आई माझी वाट बघू नका, मी आता तुम्हाला पुन्हा कधीही भेटणार नाही. मला अभ्यासाचा ताण सहन होत नाही.’ सकाळी पहाटे सहा वाजता हे आई व मुलीचे फोनवरील संभाषण. आई घाबरून वसतिगृहाच्या रेक्टरला फोन करते. रेक्टर खोलीकडे धावते, तर दार बंद. खिडकीतून पाहते तर मुलगीने गळफास घेतलेला असतो. एखाद्या चित्रपटाचा कथानक शोभेल, अशी घटना घडली आहे मडिलगे बुद्रुक (ता. भुदरगड) येथील शिवांजली संभाजी भोसले या युवतीच्या जीवनात.
शिवांजली ही लहानपणापासूनच हुशार, चुणचुणीत, देखणी. वडील माध्यमिक शाळेत शिपाई. आई-वडिलांची लहानपणापासूनच तिला इंजिनिअर करायचे या ध्येयाने प्रेरित झालेले. दहावीत ९४ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. मोठा भाऊ इंजिनिअरिंगला होता. तिचेही इंजिनिअर व्हायचे निश्चित झाले आणि गारगोटी येथील डिप्लोमा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथे सिव्हील विभागात डिस्टिंक्शन मिळवून तिने डिप्लोमा प्राप्त केला. त्यानंतर तिने बी.ई.करिता सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. इतर मुलींप्रमाणे तिचे शिक्षण सुरू झाले. मुलींच्या वसतिगृहात ती राहू लागली. दीपावलीची सुटी संपवून ती दोन दिवसांपूर्वी सबमिशनसाठी गेली होती.
आज पहाटे सहाला घरातल्या फोनची रिंग वाजली. एवढ्या सकाळी कोणाचा फोन आला? असा विचार करीत आईने फोन उचलला, तर पलीकडून शिवांजलीचा आवाज आला. गदगदीत आवाजात शिवांजली म्हणाली, ‘आई आता माझी वाट बघू नका! मी काय पुन्हा तुम्हाला दिसणार नाही. मला अभ्यासाचा ताण सहन होत नाही.’ एवढे बोलून तिने फोन ठेवला.
आई गडबडली त्यांनी लगेच वसतिगृहाच्या रेक्टरला फोन केला व सांगितले शिवांजलीच्या खोलीकडे जा आणि ती असे का बोलत आहे बघा जरा. अधीक्षक खोलीकडे गेल्या, तर खोलीचा दरवाजा बंद. खिडकीतून आत डोकावले असता शिवांजलीने ओढणीने गळफास लावून घेतला होता. शरीर निपचित लटकत होते. त्यांनी लगेच घरीही कल्पना दिली. हे वृत्त ऐकताच आईने हंबरडा फोडला,
शिवांजलीच्या पश्चात आई-वडील, भाऊ, दोन चुलते, चुलती असा परिवार आहे. मुलीच्या या आत्महत्येने आई मात्र एकाकी पडली आहे.

या घटनेने पालक धास्तावले
शिवांजलीच्या आत्महत्येने पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे की, शिक्षणाने मुले घडत आहेत की जीवघेण्या स्पर्धेने बिघडत आहेत? जीवनयात्रा ऐन तारुण्यात संपविताना आई-वडिलांचा विचार नाही की, या परीक्षापलीकडे जीवनाची अनेक क्षितिजांची कल्पना नाही? एवढ्या कठीणप्रसंगी एखाद्या मैत्रिणीजवळ अथवा घरी कल्पना दिली असती तर शिवांजलीचे जीवन वाचले असते. परीक्षेच्या कारणाने आत्महत्येने अनेक पालक धास्तावले आहेत.

Web Title: Mother, you will never meet again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.