लहानग्याच्या डोळ्यादेखत आईचा विहिरीत बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2015 00:01 IST2015-04-17T23:40:11+5:302015-04-18T00:01:09+5:30
वरकुटे-मलवडीतील प्रकार : पाणी आणताना दुर्देवी घटना

लहानग्याच्या डोळ्यादेखत आईचा विहिरीत बुडून मृत्यू
वरकुटे-मलवडी : पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेलेल्या आईचा पाच वर्षांच्या आपल्या मुलाच्या डोळ्यादेखत विहिरीत बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी पावणेआठच्या घडली. ऐन उन्हाळ्यात दुष्काळी भागात नागरिकांना पाण्यासाठी अजूनही पायपीट करावी लागत असतानाच एका शेतमजूर महिलेचा पाय घसरून विहिरीत पडून मृत्यू झाल्याने पाण्यासाठी अजून किती बळी जाणार असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.सविता अशोक जाधव (वय ३५, सध्या रा. वरकुटे-मलवडी ता. माण, मूळ रा. बसाप्पाचीवाडी ता. सातारा) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सविता जाधव या पतीसमवेत शिवाजीराव देसाई यांच्याकडे शेतमजूर म्हणून काम करतात. गावाजवळील वस्तीवर जाधव दाम्पत्य वास्तव्य करत आहे. त्यांच्या वस्तीजवळ असलेल्या विहिरीमध्ये पाणी आणण्यासाठी शुक्रवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास त्या आपल्या लहान मुलासमवेत गेल्या होत्या. विहिरीत उतरत असताना त्यांचा अचानक पाय घसरला आणि त्या विहिरीत पडल्या. हा सर्व प्रकार त्यांचा छोटा मुलगा पाहात होता. त्याची आई विहिरीत पडल्याचे समजताच तो मुलगा रडू लागला. बराचवेळ तो विहिरीजवळ रडत होता. त्यानंतर तो स्वत:हून रडत-रडत घरी आला. याचवेळी गावातून वडील घरी आले होते. त्या छोट्या मुलाने आई विहिरीत पडल्याचे वडिलांना सांगितले. अशोक जाधव यांनी आजुबाजूच्या लोकांना बोलावून घेतले. काहीवेळानंतर सविता जाधव यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान या घटनेची म्हसवड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. (वार्ताहर)