मुलांच्या खूनप्रकरणी आईवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:42 IST2021-08-27T04:42:39+5:302021-08-27T04:42:39+5:30
पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील यांनी याबाबतची फिर्याद शहर पोलिसांत दिली आहे. अनुष्का सुजित आवटे (वय ३६, रा. रुक्मिणीनगर, वाखाण ...

मुलांच्या खूनप्रकरणी आईवर गुन्हा दाखल
पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील यांनी याबाबतची फिर्याद शहर पोलिसांत दिली आहे. अनुष्का सुजित आवटे (वय ३६, रा. रुक्मिणीनगर, वाखाण रोड, कऱ्हाड), असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव असून, हर्ष (वय ८) व आदर्श (वय ६), अशी खून झालेल्या मुलांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील वाखाण रस्त्यालगत राहण्यास असलेल्या अनुष्का आवटे यांनी विषारी औषध प्राशन करून, तसेच हाताची नस कापून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बुधवारी उघडकीस आले होते. तत्पूर्वी, तिने तिच्या हर्ष व आदर्श या दोन्ही मुलांचा टॉवेलने गळा आवळून खून केला होता, तसेच त्यानंतर स्वत: विषारी औषध प्राशन केले होते. सकाळी साडेअकरा वाजूनही मुले घरातून बाहेर आली नसल्यामुळे त्यांच्या आजीने बेडरूममध्ये जाऊन पाहिले असता हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर नातेवाइकांनी अनुष्का यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले, तर दोन्ही मुलांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्याठिकाणी त्यांना अनुष्का यांनी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. पतीच्या विरहामुळे आपण हे कृत्य करीत असल्याचे त्यांनी त्या चिठ्ठीमध्ये म्हटले होते, तसेच या घटनेला कोणालाही जबाबदार धरू नये, असेही त्यांनी चिठ्ठीमध्ये म्हटले होते. पोलिसांनी ती चिठ्ठी तपासासाठी ताब्यात घेतली आहे. आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या अनुष्का यांच्यावर अद्यापही कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील यांनी कऱ्हाड शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन मुलांचा खून केल्याप्रकरणी अनुष्का यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
- चौकट
पप्पांची आठवण म्हणून मुलांना टी-शर्ट घाला!
अनुष्का यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत अनेक कौटुंबिक बाबी लिहिल्या आहेत, तसेच माझ्या मुलांना व मला या सर्वांतून मोकळे करा, असेही त्यांनी म्हटले आहे. कपाटात दोन टी-शर्ट काढून ठेवले आहेत. अंत्यसंस्कारावेळी माझ्या मुलांना पप्पांची आठवण असलेले ते शर्ट घाला, अशी शेवटची इच्छा म्हणून अनुष्का यांनी चिठ्ठीमध्ये लिहिले आहे.