बहुतांश अधिकारी सुटीला गावाकडे!
By Admin | Updated: September 10, 2015 00:43 IST2015-09-10T00:41:08+5:302015-09-10T00:43:26+5:30
घरं तर पुण्यात : पण उदयनराजे म्हणाले होते, ‘घरातून बाहेर काढा !’

बहुतांश अधिकारी सुटीला गावाकडे!
सातारा : ‘दुष्काळ निवारणासाठी लवकर निर्णय घ्या. त्यासाठी अधिकाऱ्यांना घरातून बाहेर काढा,’ असे आक्रमक विधान खासदार उदयनराजे भोसले यांनी केल्यानंतर जिल्ह््यात जोरदार चर्चा सुरू झाली. परंतु, जवळपास बहुतांश अधिकाऱ्यांची घरे जिल्ह््याबाहेरच असल्याचा शोध लागलाय. हे अधिकारी साताऱ्यात राहतच नसून दर शनिवार, रविवारी पुण्याला घराकडे जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता बोला..कोणत्या अधिकाऱ्यांना घरातून कसं बाहेर काढणार ?
दुष्काळाची चटके आॅगस्टमध्येच बसायला लागले असल्याने लोकप्रतिनिधी सावध झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दुष्काळी भागाचे दौरे सुरू केले आहेत. तर वास्तविक पाहता नैसर्गिक आपत्तीत सर्व प्रशासनाने, लोकप्रतिनिधी आणि जनतेने हातात हात घालून काम करणे अपेक्षित असते. रात्रीचा दिवस करणारे अधिकारी, लोकप्रतिनिधी लाभावेत, अशी जनतेची अपेक्षा असते.
अधिकाऱ्यांना जनतेच्या सेवेत सदैव तत्पर राहता यावे म्हणून शासकीय निवासस्थान उपलब्ध करून दिले जाते. ज्या ठिकाणी निवासस्थान उपलब्ध नाही, अशावेळी घरभाडे भत्ता दिला जातो; मात्र जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत व तहसील कार्यालयातील बहुतांश अधिकारी नेमणुकीच्या ठिकाणी राहतच नसल्याचे समोर आले आहे. काही निवासस्थानात ते एकटेच राहत असतात.
सातारा, कऱ्हाडमध्ये शिक्षणाच्या सुविधा असतानाही अनेक अधिकारी, उच्च पदस्थ कर्मचाऱ्यांची मुलं पुणे-मुंबईला उच्च शिक्षणासाठी आहेत. त्यातून त्यांच्या बदल्या दर तीन किंवा पाच वर्षांनी होत असतात. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांनी त्यांचे कुटुंबीय पुणे, नाशिक या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शहरातच ठेवले आहे. दर शनिवार, रविवारी हे अधिकारी कुटुंबीयांकडे जात असतात. (प्रतिनिधी)