फलटण तालुक्यात मृत्यूदर वाढतोय..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:39 IST2021-05-10T04:39:24+5:302021-05-10T04:39:24+5:30
फलटण : फलटण तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रभाव काही केल्या कमी होत नसल्याने प्रशासनाच्या उपाययोजना तोकड्या पडत चालल्या असून, ...

फलटण तालुक्यात मृत्यूदर वाढतोय..!
फलटण : फलटण तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रभाव काही केल्या कमी होत नसल्याने प्रशासनाच्या उपाययोजना तोकड्या पडत चालल्या असून, मृत्यूदर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
फलटण तालुक्यात दररोज ३०० ते ४०० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह येत असून, फलटण शहरासह अनेक गावे कंटेन्मेंट झोन जाहीर करूनही रुग्णसंख्या आटोक्यात येईनाशी झाली आहे. फलटण शहर व जिथे रुग्ण संख्या जास्त आहे ती सात गावे कंटेन्मेंट झोन म्हणून आठ दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली होती. मेडिकल दुकानेवगळता सर्व दुकाने कडेकोट बंद ठेवतानाच नागरिकही रस्त्यावर फिरू नये म्हणून पोलीस व नगरपालिका प्रशासनाचे कर्मचारी दिवस-रात्र फिरत आहेत. नागरिकांना बाहेर पडू नका, असे आवाहनही करत आहे. पोलिसांनी विनाकारण बाहेर पडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करून वाहने जप्त केली आहे, तरीसुद्धा काहीजण अजूनही मोकाटपणे बाहेर फिरत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. रोजची वाढती रुग्णसंख्या प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. कोरोनाबाधितांना ऑक्सिजन, इंजेक्शन, बेड मिळत नसल्याने बाधित धास्तावले गेले आहेत.
सातारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक फलटण तालुक्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढले आहे शासनाने पंधरा तारखेपर्यंत कंटेन्मेंट झोन वाढविले असून, रुग्णसंख्या कमी न झाल्यास ते आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दुसरीकडे लसीकरणाचा वेग कमालीचा मंदावला असून, अनेकांना लस मिळत नसल्याने जनता धास्तावली गेली आहे. प्रत्येकाला लस मिळाली नाही तर प्रादुर्भाव वाढत जाणार असल्याने प्रशासनही चिंतेत पडले आहे.
वाढता कोरोना रोखण्यासाठी नागरिकांनी बाहेर पडणे टाळतानाच प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले तरच कोरोनाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.
चौकट...
कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले असताना व बाधितांची संख्या वाढली असतानाही अनेक तरुण मुले रस्त्यांवर क्रिकेट खेळताना सर्रासपणे आढळत असून, यामुळेही कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त होत आहे. गर्दी जमवून विनामास्क क्रिकेट खेळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे.