रहदारीच्या रस्त्यावर माॅर्निंग वाॅक..आयुष्याचे ठरेल शेवटचे टोक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:20 IST2021-02-05T09:20:34+5:302021-02-05T09:20:34+5:30
सातारा: आजकाल ताण तणावामुळे शरीरासाठी व्यायाम अत्यंत गरजेचा आहे. याचे महत्व साऱ्यांनाच पटू लागल्यामुळे अनेकजण आपल्या परीने वेळ काढून ...

रहदारीच्या रस्त्यावर माॅर्निंग वाॅक..आयुष्याचे ठरेल शेवटचे टोक
सातारा: आजकाल ताण तणावामुळे शरीरासाठी व्यायाम अत्यंत गरजेचा आहे. याचे महत्व साऱ्यांनाच पटू लागल्यामुळे अनेकजण आपल्या परीने वेळ काढून माॅर्निंग वाॅक करत आहेत. पण हेच माॅर्निंग वाॅक अलीकडे अनेकांसाठी जीवघेणे ठरत असून, स्वत:चा निष्काळजीपणा अन् वाहनचालकांचा बेदरकारपणा याला कारणीभूत ठरत आहे. यासाठी केवळ सतर्कता हीच महत्वाची असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
लोणंद येथे गुरुवारी माॅर्निंग वाॅकला गेलेल्या सासू, सासरे आणि सुनेचा भरधाव कारने जीव घेतला. या दुर्दैवी घटनेनंतर समाजमन अक्षरश: हेलावून गेले. तसं पाहिलं तर माॅर्निंग वाॅक करताना यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. मात्र, तरीही यातून कोणी बोध घेत नाही. अशा प्रकारच्या घटना वारंवार का घडत आहेत, याचा विचार होणे गरजेचे आहे. फलटण तालुक्यामध्ये तीन वर्षांपूर्वी पहाटे रस्त्यावर व्यायाम करणाऱ्या दोन युवकांचा भरधाव टेम्पोने जीव घेतला होता. त्यानंतर अशाच प्रकारची घटना वाई तालुक्यातही घडली होती. एका युवकाला माॅर्निंग वाॅक करताना अज्ञात वाहनाने उडवले होते. तसेच कऱ्हाडमध्येही एका युवतीला सकाळच्या सुमारास व्यायाम करताना धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला होता.अशा प्रकारचे अपघात का घडत असतात, याचा महामार्ग पोलिसांनी निष्कर्ष काढला, त्यावेळी अनेक बाबी समोर आल्या.
पहाटेच्या सुमारास वाहन चालकांना डुलकी लागत असते. त्यामुळे असे अपघात घडत असतात. हे अपघात टाळण्यासाठी माॅर्निंग वाॅकला जाणाऱ्या लोकांनी प्रचंड सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे अपघातात शक्यतो माॅर्निंग वाॅक करणाऱ्यांना पाठीमागून वाहनाने धडक दिली आहे. त्यामुळे जी वाहने समोरून येतात. त्याच बाजूने रस्त्याच्या कडेने चालणे योग्य ठरेल. शक्यतो रहदारी असलेल्या रस्त्याच्या कडेने माॅर्निंग वाॅक करूच नये. आजूबाजूची मैदाने किंवा गावातील शाळेच्या पटांगणात चालण्याचा व्यायाम करावा. रहदारीच्या रस्त्यावर माॅर्निंग वाॅकला जाणे म्हणजे मृत्यूच्या दाढेत ओढावून घेतल्यासारखा प्रकार आहे. त्यामुळे माॅर्निंग वाॅकला जाताना सतर्कता हीच आपल्या आयुष्याला तारू शकेल, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.