कोल्हापूर नाक्यावरील मोरी वाहतुकीस होणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:12 IST2021-02-05T09:12:37+5:302021-02-05T09:12:37+5:30
कऱ्हाडात कोल्हापूर नाक्यानजीक उड्डाण पुलाखाली कोयना मोरी आहे. पंकज हॉटेलकडून, तसेच शहरातून कऱ्हाड हॉस्पिटलकडून आलेली अनेक वाहने या मोरीतून ...

कोल्हापूर नाक्यावरील मोरी वाहतुकीस होणार बंद
कऱ्हाडात कोल्हापूर नाक्यानजीक उड्डाण पुलाखाली कोयना मोरी आहे. पंकज हॉटेलकडून, तसेच शहरातून कऱ्हाड हॉस्पिटलकडून आलेली अनेक वाहने या मोरीतून पलीकडे जाऊन कोल्हापूर-सातारा लेनवर पोहोचतात. मात्र, मोरी अरुंंद असल्यामुळे मोरीतून वाहनाचा अर्धा भाग बाहेर आल्याशिवाय चालकाला महामार्गावरून कोल्हापूर नाक्याकडून आलेले वाहन दिसत नाही. तसेच याठिकाणी महामार्गावर येताना चढण आहे. कोल्हापूर बाजूकडून येणारी भरधाव वाहने आणि मोरीतील रस्त्याला असलेली चढण यामुळे या ठिकाणी अपघात होतात. हे ठिकाणी ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून घोषित करण्यात आले असून, त्याची नोंद ६८२ क्रमांकावर घेण्यात आली आहे.
कोयना मोरीतून बाहेर पडणाऱ्या वाहनांमुळे या ठिकाणी अपघात होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर गुरुवारी कऱ्हाड वाहतूक शाखेच्या सहायक निरीक्षक सरोजिनी पाटील यांनी सुचविलेल्या पर्यायानुसार प्रांताधिकारी उत्तम दिघे, उपअधीक्षक रणजित पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सगरे, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांनी मोरी परिसराची पाहणी करून ही मोरी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा निर्णय घेण्यात आला असून, यावर कोणाला काही हरकत असल्यास संबंधितांनी सात दिवसांत कऱ्हाडच्या वाहतूक शाखेत आपले म्हणणे सादर करावे, असे आवाहन सहायक निरीक्षक सरोजिनी पाटील यांनी केले आहे.
- चौकट
आरसा... असून अडचण, नसून खोळंबा
कोल्हापूर नाक्यानजीकच्या या मोरीत सामाजिक बांधीलकीतून काहीजणांनी आरसा बसविला होता. मोरीतून रस्ता ओलांडणाऱ्या वाहनांच्या चालकांना कोल्हापूर बाजूकडून येणारी वाहने दिसावीत, हा त्यामागचा उद्देश होता. मात्र, रस्त्याला चढण असल्यामुळे या आरशाचाही म्हणावा तेवढा उपयोग होत नव्हता. आरसा असून अडचण, नसून खोळंबा अशा स्थितीत होता.
.............................................................