नव्वदहून अधिक भाजीवाल्यांवर संक्रांत!

By Admin | Updated: March 10, 2016 23:41 IST2016-03-10T21:33:09+5:302016-03-10T23:41:39+5:30

अतिक्रमण हटाव मोहीम : पालिका परिसराने घेतला मोकळा श्वास; अनेकांनी स्वत:हून काढले अतिक्रमण

More than ninety-five Bhajivals! | नव्वदहून अधिक भाजीवाल्यांवर संक्रांत!

नव्वदहून अधिक भाजीवाल्यांवर संक्रांत!

कऱ्हाड : पालिकेच्या जागेत व सार्वजनिक ठिकाणी रस्त्याच्या कडेला भाजी विके्रते व स्टॉलधारकांकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले जात होते. अशा अतिक्रमण केलेल्या नव्वदहून अधिक भाजीविक्रेत्यांवर तसेच स्टॉलधारकांवर पालिकेच्या वतीने गुरुवारी कारवाई करण्यात आली. यावेळी आपला माल विक्रीसाठी घेऊन आलेल्या भाजी विक्रेत्यावर पालिकेने केलेल्या कारवाईमुळे संक्रांतीची वेळ आली.
शहरातील पालिकेच्या हद्दीमध्ये व नो हॉकर्स झोनमध्ये येणाऱ्या दुकाने, चारचाकी हातगाडेधारकांवर अतिक्रमण हटावाची कारवाई करण्यास पालिकेच्या वतीने प्रत्येक्षपणे सुरुवात करण्यात आली. आठवड्यातून रविवारी व गुरुवारी संभाजी भाजी मंडई येथे शहरातील भाजी विक्रेत्यांनी बसावे अशा सूचना पालिकेच्या वतीने भाजी विक्रेत्यांना करण्यात आल्या होत्या.
भाजी मंडई परिसरात स्टॉल व खोकीधारकांनी अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे अनेकवेळा पालिकेकडून सांगितले गेले होते. त्याअनुषंगाने गेल्या महिन्यात मंडई परिसरात पालिकेकडून अतिक्रमणाची कारवाई देखील करण्यात आली. मात्र, अतिक्रमणांच्या कारवाईबाबत चारचाकी हातगाडाधारक संघटनेकडून न्यायालायात पालिकेच्या विरोधात दावा दाखल करण्यात आल्यामुळे ही करावाईची मोहीम बंद ठेवण्यात आली होती.
न्यायालयाकडून नुकताच अतिक्रमणाबाबत निकाल देण्यात आल्यामुळे पालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी शहरातील जेवढ्या ठिकाणी अनधिकृतपणे अतिक्रमणे आहेत. तेवढ्या ठिकाणी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सुरुवातीला शहरातील मंडई परिसर, सार्वजनिक ठिकाणे, फूटपाथ मार्ग अशा नो हॉकर्स झोनपरिसरात लावण्यात आलेल्या अनधिकृत स्टॉलधारक, चारचाकी हातगाडेधाकांवर कारवाई केली जात आहे.
न्यायालयाच्या निकालानंतर पालिकेने केलेल्या दुसऱ्या दिवशीच्या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात पालिका परिसरातील दक्षिण व पश्चिमेकडील बाजूस असलेल्या कापडाच्या स्टॉलधारकांना व भाजीविक्रेत्यांना त्याठिकाणाहून हटविण्यात आले. तर यावेळी काही भाजी विक्रेत्यांनी स्वत:हून आपला माल उचलला तर काही स्टॉल, हातगाडाधारकांनी आपली अतिक्रमणे काढून घेतली.
पालिका परिसरात हातगाडाधारक व भाजी विक्रेत्यांवर गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पालिकेच्या बांधकाम विभाग व आरोग्य विभागाच्या चाळीस कर्मचाऱ्यांनी एक ट्रॅक्टरच्या साह्याने कारवाई केली. या कारवाई दरम्यान, भाजी मंडई परिसरातील विक्रेत्यांनी पालिका मुख्याधिकारी औंधकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी अनधिकृतपणे केलेल्या अतिक्रमणावर कारवाई केलीच जाणार असे सांगितले.
पालिकेकडून गुरुवारी करण्यात आलेल्या या अतिक्रमण हटावाच्या कारवाईमध्ये नव्वदहून अधिक भाजी विक्रेते तर वीसहून अधिक स्टॉल, चारचाकी हातगाडाधारकांना हटविण्यात आले.
आठवड्यातील गुरुवार हा बाजाराचा दिवस असल्याने पालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे भाजी विक्रेत्यांना संभाजी भाजी मंडई परिसरात बसावे लागले.
पालिकेकडून आत्तापर्यंत शहरात अतिक्रमणाबाबत गेल्या महिन्यात चारवेळा कारवाई करण्यात आलेली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये पालिका परिसरातील व्यापाऱ्यांची अतिक्रमणे काढण्यात आली होती. त्यानंतर बसस्थानकासमोर एका हॉटेलवरील अतिक्रमण काढण्यात आले. तर फेबु्रवारीच्या पहिल्या आठवड्यात मंडई परिसर, बसस्थानक परिसरातील अतिक्रमणेही हटविण्यात आली होती. त्यानंतर आता न्यायालयाच्या निकालानंतर महिन्यातील मोठी अतिक्रणाची कारवाई पालिकेकडून करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)


अतिक्रमणाच्या कारवाईसाठी पथक
शहरात न्यायालयाच्या निकालानंतर राबविल्या जाणाऱ्या अतिक्रमण कारवाईसाठी १५ कामगार, ४ मुकादम, १ इंजिनिअर व वीजवितरण अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाकडून शहरातील पालिकेच्या जागेत व सार्वजनिक ठिकाणी केलेली अतिक्रमणे सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत काढले जाणार आहे. हे पथक प्रत्येक दिवशी शहरातील विविध ठिकाणावरील अतिक्रमणे काढणार आहे.

कऱ्हाड शहरात सुरुवातीला व्यापाऱ्यांना व विके्रत्यांना अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार पालिकेकडून अतिक्रमणही काढले जात होते. मात्र, चारचाकी हातगाडाधारक संघटनेचे पदाधिकारी न्यायालयात गेले. त्याठिकाणी त्यांनी दावा दाखल केला. आता न्यायालयाने पालिकेच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे कायद्याचे सर्वतोपरी पालन करून शहरातील अतिक्रमणे काढण्यात येणार आहे.
- विनायक औंधकर, मुख्याधिकारी, नगरपालिका कऱ्हाड

Web Title: More than ninety-five Bhajivals!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.