कऱ्हाडमध्ये अंगणवाडी सेविकांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:43 IST2021-08-25T04:43:58+5:302021-08-25T04:43:58+5:30
कऱ्हाड : राज्य शासनाने पोषण अभियान कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे आहेत. या मोबाईलची क्षमता कमी असल्यामुळे ...

कऱ्हाडमध्ये अंगणवाडी सेविकांचा मोर्चा
कऱ्हाड : राज्य शासनाने पोषण अभियान कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे आहेत. या मोबाईलची क्षमता कमी असल्यामुळे व ते निकृष्ट दर्जाचे असल्याने ते व्यवस्थित चालत नाहीत. हे मोबाईल बदलून द्यावेत, या मागणीची शासन दखल घेत नाही. त्यामुळे मंगळवारी अंगणवाडी सेविकांनी कऱ्हाड येथे मोर्चा काढला.
या मागणीचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. या मोर्चाला भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी सक्रिय पाठिंबा देत, या मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. यावेळी संजय शेवाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
शासकीय कामासाठी शासनाने दिलेल्या जुन्या मोबाईलची सध्याची परिस्थिती फार वाईट आहे. त्याची वॉरंटी संपली आहे. हे मोबाईल सतत हँग होतात, गरम होतात. तसेच बंद पडतात. त्याची क्षमताही कमी आहे. शिवाय शासनाने ‘पोषण ट्रॅकर’ दिले असून, ते इंग्रजी भाषेत असल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे शासनाने दिलेले मोबाईल बदलून द्यावेत, या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी अनेकदा आंदोलने केली, पण राज्य शासनाने त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळेच आज अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढून शासनाने दिलेले मोबाईल शासनाला परत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे विमल चुनाडे यांनी सांगितले.
दरम्यान, या मोर्चाला जाहीर पाठिंबा देत भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी अंगणवाडी सेविकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी महिला व बालकल्याण विकासमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासमवेत लवकरच बैठक आयोजित करण्याची ग्वाही दिली. तसेच या प्रश्नांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
या आंदोलनात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या जिल्हाध्यक्षा विमल चुनाडे, उज्वला जगताप, यशोदा पवार, उज्वला मोहिते, छाया पाटील, शबाना सुतार, विमल माने, मंगल जाधव, शशिका संकपळ, सुरेखा गायकवाड, निवासराव मोहिते यांच्यासह अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी होत्या.
चौकट
दरम्यान, आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या अंगणवाडी सेविकांचे निवेदन स्वीकारायला बराच वेळ कोणी फिरकले नाही. शेवटी सहायक बालविकास प्रकल्प अधिकारी प्रतिभा लोंढे यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी अंगणवाडी सेविकांनी घोषणा देत शासनाचा निषेध केला.
फोटो ओळी : २४ कराड अंगणवाडी
कऱ्हाड येथे अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला डाॅ. अतुल भोसले यांनी पाठिंबा दिला.