निकृष्ट मोबाइलकडे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी सेविकांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:36 IST2021-08-29T04:36:45+5:302021-08-29T04:36:45+5:30
रामापूर : अंगणवाडी सेविकांना शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाकडून सेविकांचे काम सुलभ आणि जलद होण्यासाठी मोबाइल देण्यात आले ...

निकृष्ट मोबाइलकडे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी सेविकांचा मोर्चा
रामापूर : अंगणवाडी सेविकांना शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाकडून सेविकांचे काम सुलभ आणि जलद होण्यासाठी मोबाइल देण्यात आले होते. ते निकृष्ट दर्जाचे असल्याने परत घ्यावेत, या मागणीसाठी पाटण तालुका अंगणवाडी कर्मचारी संघटनेने, पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयासमोर मोर्चा काढून आंदोलन केले. आंदोलनात तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या.
याप्रसंगी प्रकल्प अधिकारी व्ही. बी. विभुते यांना निकृष्ट दर्जाचे मोबाइल परत घ्यावेत यासाठीचे निवेदन दिले. एकात्मिक बाल विकास विभागाच्या वतीने काम सुलभ होण्यासाठी अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले मोबाइल हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. यामध्ये मुलाची माहिती, लसीकरण, विविध सर्वे आदींची माहितीही याच मोबाइलच्या माध्यमातून भरत होत्या. ते वेळेत व्यवस्थित चालत नसल्याने बंद पडत असून, गरमही होत होते. काहींनी स्वखर्चाने दुरुस्त केले; पण त्याचा काही उपयोग झाला नाही. यासाठी अंगणवाडी सेविकांना पदरमोड करावी लागत असून, ते न परवडणारे आहे. त्यामुळे हे निकृष्ट दर्जाचे मोबाइल परत घ्यावेत, अशी मागणी सेविकांनी केली
मोबाइलवर विविध प्रकारची माहिती भरावी लागते. त्यामुळे त्याची साठवणूक क्षमता ही जास्त असायला हवी. त्यावर मराठीत माहिती भरण्याची सोय असावी, जेणेकरून ती तत्काळ भरता येणे सोपे होईल. पोषण ॲपवर अनेक त्रुटी असून, त्या दूर कराव्यात. इंग्रजीत सॉफ्टवेअर असल्याने अनेकांना ते समजत नाही. याबरोबरच मोबाइलवर माहिती भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे हे मोबाइल तातडीने परत घेऊन नवीन मोबाइल द्यावेत यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
या वेळी संघटनेच्या अध्यक्ष आनंदी अवघडे, तालुकाप्रमुख अनिता चव्हाण, सुभद्रा कुंभार, विद्या कदम, सुनीता वरेकर, कविता पवार, संतोष पवार यांच्यासह अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.