मोरणा प्रकल्प विळख्यात..!
By Admin | Updated: July 28, 2015 00:31 IST2015-07-27T22:18:28+5:302015-07-28T00:31:13+5:30
बेकायदा कृत्यांना ऊत : गावगुंडांची दमबाजी; पाणलोट क्षेत्रालगत जमिनी काबीज, अनेकांनी पाडले फ्लॉट

मोरणा प्रकल्प विळख्यात..!
अरूण पवार - पाटण -स्थानिक भूमिपुत्रांनी आपल्या सर्वस्वाचा व अस्तित्वाचा त्याग करून जमिनी दिल्या. त्यांना घरेदारे सोडून इतरत्र जावे लागले. त्या मोरणा-गुरेघर प्रकल्पावर सध्या धनदांडग्यांचं राज्य निर्माण होऊ लागले आहे. गावगुंड प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांना दमबाजी करू लागले आहेत. प्रकल्पाच्या ठेकेदाराकडून काही कामे शिल्लक असून, शासनानेही ठेकेदाराचे बिल अडकविले आहे. फार्म हाऊस, बंगले यासाठी मोरणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रालगत जमिनी काबीज करून श्रीमंतांनी फ्लॉट पाडले आहेत. त्यामुळे प्रकल्प धनदांडग्यांच्या विळख्यात सापडला आहे.
सध्या मोरणा प्रकल्पाचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले असून, डाव्या व उजव्या कालव्यांची कामे मात्र रखडली आहेत. त्यामुळे १९९६ मध्ये निर्माण झालेल्या या प्रकल्पाचा आजअखेर शेतकऱ्यांना लाभ झालेला नाही. जवळपास १ टीएमसी पाणीसाठा क्षमता असलेला हा प्रकल्प सध्या तुडुंब भरलाय; मात्र या प्रकल्पावर ठेकेदार, शासनाचे नियंत्रण राहिलेले नाही.
त्यामुळे आओ-जाओ घर तुम्हारा, अशी गत होऊन बसली आहे. पर्यटनाच्या नावाखाली बाहेर लॅन्डमाफियांनी प्रकल्पासभोवतालच्या जमिनी काबीज केल्या आहेत. फार्म हाऊस बांधण्यासाठी जमिनीचे फ्लॉट पाडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या कॅचमेट एरियाला धोका निर्माण झाला आहे.
प्रकल्पात येणाऱ्या पाण्याच्या उगमस्थानीच बांधकाम करण्याचा घाट घातला जात आहे. परवान्याच्या नावाखाली अवैध मासेमारीला उधाण आले आहे. शासनाची कोणतीही यंत्रणा या प्रकल्पाची काळजीपूर्वक देखरेख करताना दिसत नाही. राज्यातील सिंचन घोटाळ्यामुळे मोरणा-गुरेघर प्रकल्पाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे ५८ कोटी खर्च केलेल्या मोरणा प्रकल्पाचे अस्तित्व नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे.
कालव्याची कामे अर्धवट...
मोरणा प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यांची कामे अर्धवट स्थितीत असून ती बंद पडलेली आहेत. ठेकेदारांची यंत्रणा, कालवे व मातीचे ढीग अडचणीचे ठरू लागले आहेत. काही ठेकेदारांनी भ्रष्टाचार करून इतरांची लाखोंची देणी रखडविली आहेत. त्यामुळे मोरणा भागात संताप व्यक्त केला जात आहे.