मोबाईल टॉवरवर माकडाचा ‘शोले’
By Admin | Updated: June 16, 2016 00:57 IST2016-06-16T00:12:56+5:302016-06-16T00:57:03+5:30
कूपर कॉलनीतील प्रकार : उंचावरील टॉवरवर खाली उतरता येईना

मोबाईल टॉवरवर माकडाचा ‘शोले’
सातारा : सर सर झाडावरून उड्या मारणाऱ्या माकडांना कशाचीच भीती वाटत नाही. परंतु अती उंच टॉवरवर चढणाऱ्या माकडाला मात्र भीती पोटी खाली उतरता आले नाही. अगदी सकाळी-सकाळी या माकडाने शोले फिल्मप्रमाणे जणू आत्महत्या करायला चढलेला दृष्यच केला होता. असे प्रत्यक्षदर्शनी पाहणाऱ्या नागरिकांनी सांगितले.
सदर बझार येथील कूपर कॉलनी लगत भले मोठे मोबाईल टॉवर आहे. या टॉवरवर वेगळीच झाडे झुडपे असून, या ठिकाणी सतत माकडांची टोळकी दिसून येतात. बुधवारी सकाळी ७ वाजता दोन माकडांची भांडणे लागली असता त्यातील एका माकडाने या टॉवरवर उडी मारत अती उंची ठिकाणी पळत सुटले. आणि जाऊन थांबले परंतु त्या नंतर त्या माकडाने उंचीवर जाऊन खाली बघीतले तर त्याला खाली उतरताना मोठी अडचण येऊ लागली. ते टॉवरमधील पॅसेजवर हेलपाटे मारून खाली उतरण्यासाठी धडपडू लागले.
परंतु खाली उतरता येत नव्हते. १०० फुटाहून अधिक उंच असणाऱ्या या टॉवरमध्ये अडकलेले हे माकड जवळपास दोन ते तीन तास तसेच घुटमळत होते. खाली येण्यासाठी त्याचा प्रयत्न करताना मध्येच दचकत पुन्हा पॅसेजमध्ये जाऊन बसत होता. त्याच्या या सर्व हालचाली खालून काही नागरिक पाहत होते. परंतु त्याला मदत करणे अवघड होते. त्यामुळे बघ्याची भूमिका घ्यावी लागली.
दरम्यान, सकाळी ९ वाजता हे माकड हळूहळू थोड्या वेळाने खाली आले. त्यानंतर त्याने तेथे थोडी विश्रांती घेत. पुन्हा काही वेळाने खाली येऊन त्याने शेवटी झाडावर उडी मारली. अन् निघून गेले. शोले फिल्ममध्ये ज्या पद्धतीने अभिनेत्याने आपली मागणी मान्य करण्यासाठी आत्महत्याचा इशारा दिला होता. त्याच पद्धतीने हे माकडही स्टंट करतेय का काय? अशी चर्चा नागरिकांत होती. खुप उंचीवर गेल्याने खाली उतरताना हे माकड प्रचंड घाबरल्याचे नागरिकांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)
भरभर उंची गाठल्यानंतर पुन्हा खाली उतरताना माकडाची त्रेधा उडाली. त्यामुळे मजल-दरमजल करत विश्रांती घेत माकड हळूहळू या टॉवरवरून खाली उतरत होते. अनेक उत्साही कार्यकर्त्यांनी माकडाचे हे चाळे मोबाईलमध्ये कैद केले.