सातारा : आरोपींना न्यायालयात घेऊन निघालेल्या पोलीस व्हॅन व जीप यांच्यात अपघात झाला. सातारा येथे ठाण्याहून फिरायला आलेल्या जीप व पोलीस व्हॅन यांच्यातील अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, जीमध्ये असलेल्या प्रवाशांनी पोलीस व्हॅनचालकाकडून साडेपाच हजारांची भरपाई वसूल केले. याबाबत घटनास्थळावरून आणि जीपचालक मूर्ती मुंडे यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सातारा जिल्हा पोलीस दलाची व्हॅन (एमएच ११ एबी ८१२९) काही आरोपींना घेऊन न्यायालयीन कामकाजासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात निघाली होती. याचवेळी ठाण्याच्या पर्यटकांना सज्जनगडला घेऊन निघालेल्या जीपला (एमएच ०४ एफझेड २००१) पोलीस व्हॅनची धडक बसली. जीपचे चालक मूर्ती मुंडे (रा. दिवा स्टेशन, जि. ठाणे) होते. तर आरेंद्र पाटील यांच्यासह पाचजण प्रवासी होते. या धडकेत दोन्ही गाड्यांचे थोडे फार नुकसान झाले. मात्र, जीपचालक मूर्ती मुंडे यांनी ही चूक पोलीस व्हॅनचीच असल्याचे निदर्शनास आणून दिले. परिणामी पोलिसांनी नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले. यावेळी पोलीस व्हॅनमध्ये बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांनी एका मेकॅनिकला बोलावले आणि नुकसान झालेल्या जीपची पाहणी केली तर त्याने दहा हजार रुपये खर्च येईल, असे सांगितले. मात्र, मध्यस्थीनंतर पोलिसांनी साडेपाच हजार रुपये देण्याचे मान्य केले आणि जीपचालक ठाण्याच्या दिशेने निघून गेला. (प्रतिनिधी)आरोपी घाबरलेसातारा जिल्हा पोलीस दलाची व्हॅन आरोपींना घेऊन न्यायालयीन कामकाजासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात निघाली होती. यावेळी बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी व्हॅनमध्ये होते. मात्र, अचानकपणे धडक झाल्याचा आवाज आल्यानंतर आरोपीही घाबरून गेले होते. मात्र, थोड्या वेळाने त्यांना नेमका प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला.
खाकीकडूनच पैसा वसूल
By admin | Updated: January 20, 2015 00:01 IST