पैसे खात्यात; खडखडाट खिशात

By Admin | Updated: November 25, 2014 23:46 IST2014-11-25T22:42:13+5:302014-11-25T23:46:42+5:30

‘एटीएम’ पाच दिवसांपासून बंद : पुसेगाव यात्रेच्या तोंडावर व्यापारी अडचणीत

Money in the account; Rumble pocket | पैसे खात्यात; खडखडाट खिशात

पैसे खात्यात; खडखडाट खिशात

पुसेगाव : जिल्ह्यातील यात्रांच्या हंगामास सुरुवात झाली आहे. महिना भरात सेवागिरी यात्रेस प्रारंभ होईल. ही यात्रा सुमारे पंधरा दिवस चालत असल्याने मोठी उलाढाल होत असते. मात्र, येथील एटीएम यंत्रणा पाच दिवसांपासून बंद असल्याने व्यापाऱ्यांना यात्रेसाठी खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पैसे खात्यात असून खिशात खडखडाट जाणवत आहे.
सातारा-पंढरपूर रस्त्यावरील सुमारे ५५ गावे व वाड्यावस्त्यांची प्रमुख बाजारपेठ तसेच महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात व आंध्रप्रदेशतील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पुसेगाव येथील ‘एटीएम’ सेंटर केवळ शोभेची वस्तू बनली आहे. आठवड्यातून चार-पाच दिवस बंद असलेल्या‘एटीएम’मुळे येथे येणाऱ्या ग्राहकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. बँक आॅफ महाराष्ट्र व स्टेट बँक आॅफ इंडिया यांनी स्वत:चे एटीएम यंत्रणा सुरळीत चालू ठेवण्याची मागणी होऊ लागली आहे.
पुसेगाव पोलीस ठाणे, राष्ट्रीयकृत बँका, पोस्ट कार्यालय, पतसंस्था याच्या व्यवहारासाठी तसेच लहानमोठ्या खरेदीसाठी परिसरातील नागरिकांची पुसेगावात सातत्याने ये-जा नेहमीच असते.
राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले श्री सेवागिरी महाराजांचे पवित्र स्थान पुसेगावात असल्याने दररोज तसेच दर अमावस्येला येथे हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात.
यात्रा काळात लाखो भाविक एकाच दिवशी पुसेगावात हजेरी लावत असतात. पुसेगावात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कायम बंद असलेल्या ‘एटीएम’मुळे आर्थिक अडचण आल्यास काहीही पर्याय राहत नाही.
येथे असलेल्या दोन ‘एटीएम’पैकी एक कधीतरीच सुरळीतपणे सुरू असते तर दुसऱ्या ‘एटीएम’मध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने पैसे काढण्यासाठी मोठ्या अपेक्षेने आलेल्यांची निराशा होते. त्यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प होतात.
सेवागिरी महाराजांची वार्षिक यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यानिमित्ताने यात्रा कालावधीत येथे येणाऱ्या व्यावसायिक व दुकानदार व संबंधितांची विविध कारणासाठी या गावात ये-जा सुरू झाली आहे. ग्राहकांचे आर्थिक नुकसान होऊ नये तसेच येथे येणाऱ्या कोणत्याही नागरिकांना केवळ एटीएम बंद असल्याने मानसिक त्रास सहन करावा लागू नये म्हणून संबंधित बँकांनी ही यंत्रणा अद्यावत करून घ्यावीत अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Money in the account; Rumble pocket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.