सोनगाव परिसरात रस्त्याच्या डांबरीकरणाला मिळेना मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:18 IST2021-02-05T09:18:34+5:302021-02-05T09:18:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शेंद्रे : सातारा तालुक्यातील सोनगाव - आसनगाव रस्त्यावर सोनगाव परिसरात खडीकरण व डांबरीकरणाचे सुरू असणारे काम ...

सोनगाव परिसरात रस्त्याच्या डांबरीकरणाला मिळेना मुहूर्त
लोकमत न्यूज नेटवर्क
शेंद्रे : सातारा तालुक्यातील सोनगाव - आसनगाव रस्त्यावर सोनगाव परिसरात खडीकरण व डांबरीकरणाचे सुरू असणारे काम एक महिन्यापासून बंद आहे. परिणामी स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. हे काम तातडीने सुरू करावे, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा सोनगाव ग्रामस्थांनी दिला आहे.
या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम मंजूर झाले असून, ठेकेदाराने सोनगाव परिसरात फक्त खडीकरण केले आहे. त्यामुळे गेल्या एक महिन्यापासून लोकांना या खडबडीत रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याच्या खडीकरणावर ठेकेदाराकडून डांबरीकरणाचे काम न केले गेल्याने या खडबडीत रस्त्यावर दुचाकी चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. प्रामुख्याने वयोवृद्ध व्यक्ती व महिलांना या समस्येचा मोठा सामना करावा लागत आहे. परिणामी या रस्त्यावर अपघातांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्त्यावर डांबरीकरण न झाल्यामुळे दुचाकी वाहन खडीवरून घसरत आहे. या रस्त्याचा वापर सोनगाव, शेळकेवाडी, कुमठे, मापरवाडी, आसनगाव या परिसरातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात करतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेऊन तात्काळ या रस्त्याचे राहिलेले डांबरीकरणाचे काम संबंधित ठेकेदाराला सूचना देऊन त्वरित करून घ्यावे, अन्यथा सोनगाव, शेळकेवाडी परिसरातील ग्रामस्थ तीव्र आंदोलन करतील, असा इशारा दिला आहे.
फोटो :
सोनगाव परिसरात रस्त्याचे खडीकरण होऊन महिना झाला तरी या रस्त्यावर डांबरीकरण न झाल्याने वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.