राज्यात आता मोबाईल मिलिटरी कँटीन!

By Admin | Updated: March 13, 2016 00:59 IST2016-03-13T00:53:09+5:302016-03-13T00:59:24+5:30

चंद्रकांत पाटील : निवृत्तीनंतरही सैनिकांनी समाजकार्यात सहभागी व्हावे

Mobile military canteen now! | राज्यात आता मोबाईल मिलिटरी कँटीन!

राज्यात आता मोबाईल मिलिटरी कँटीन!

सातारा : ‘जिल्ह्यात केवळ दोनच ठिकाणी मिलिटरी कँटीन उपलब्ध असल्याने मोठ्या संख्येने असणाऱ्या आजी-माजी सैनिकांसह त्यांच्या कुटुंबीयांची गैरसोय होत आहे, हे लक्षात घेऊन तालुक्याच्या ठिकाणी हे कँॅटीन उभारणीसाठी प्रयत्न केले जातील. या सोबतच ‘मोबाईल मिलिटरी कँटीन’ ही अनोखी संकल्पना अस्तित्वात आणून गावोगावी विखुरलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्याचे काम राज्य शासन करेल,’ अशी घोषणा राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
सातारा येथे शनिवारी जय जवान, जय किसान प्रतिष्ठान, पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेतर्फे आयोजित केलेल्या कार्यकारिणी सदस्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी आ. दिलीप येळगावकर, भरत पाटील, नगरसेविका सुवर्णा पाटील, रवींद्र पवार, शहराध्यक्ष सुनील काळेकर, सुरेश गोडसे आदींची उपस्थिती होती.
‘मागील सरकारच्या काळात सैनिकांनाच नव्हे, तर सर्वसामान्य लोकांनाही आंदोलन केल्याशिवाय न्याय्य मागण्या मंजूर होत नव्हत्या; मात्र छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांच्या आमच्या काळात आंदोलन न करताच प्रश्न मिटविले जातात,’ अशी कोपरखळी सहकारमंत्र्यांनी आघाडी शासनाला मारली. ते पुढे म्हणाले, ‘शेतकरी, जवान, महिला, लहान मुलांचेही प्रश्न सरकार जाणून आहे. देशाच्या सीमा ज्यांच्यामुळे सुरक्षित आहे, त्या सैनिकांची कुठलीही मागणी भाजप सरकार अडविणार नाही. सैनिकांच्या अंगी असणाऱ्या शिस्तीचा संपूर्ण समाजाला लाभ होत असतो. त्यामुळे सैनिकांनी निवृत्तीनंतर समाजकार्यासाठी पुढे यावे. जलयुक्त शिवार अभियान, आमदार दत्तक गाव योजना असे प्रकल्प सरकारने हाती घेतले आहेत, यापैकी अनेक प्रकल्पांचे नेतृत्व सैनिकांनी केले तर निश्चितपणाने ही कामे भ्रष्टाचारविरहित व वर्षानुवर्षे समाजाला उपलब्धी देणारी ठरू शकतील. ’
यावेळी निवृत्त कर्नल सुरेश पाटील, निवृत्त लेफ्टनंट कर्नल राजेंद्रकुमार जाधव, कर्नल गणेश घोरपडे, विद्याधर ताटे, सुरेश माने आदींचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
सर्वसोयींनियुक्त सैनिकी रुग्णालय
पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या वतीने तालुकावार मिलिटरी कँटीनची उभारणी, सैनिकांसाठी अद्ययावत हॉस्पिटलची उभारणी करावी, या मागण्या सहकारमंत्र्यांकडे करण्यात आल्या. त्यापैकी सर्व मागण्यांचे पत्र मुख्यमंत्र्यांपुढे मांडून त्यांच्या सहीचे पत्र केंद्र शासनाला पाठवून त्याचा पाठपुरावा केला जाईल. तसेच पुण्याच्या सैनिकी रुग्णालयाच्या धर्तीवर सातारा या मध्यवर्ती ठिकाणी अद्ययावत रुग्णालय उभारण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले.
राष्ट्रवादीची मंडळी फुकटचे श्रेय घेण्यात पटाईत
‘आघाडी शासनाला गेल्या १५ वर्षांत जी कामे जमली नाहीत, ती भाजपने अल्पावधीत केली आहेत. पुणे-बेंगलोर महामार्गाची कामे वेगाने सुरू आहेत. पंढरपूर महामार्गालाही शासनाने निधी दिला. साताऱ्यातील पोवई नाक्यावर उड्डाणपुलासाठीही शासनाने निधी उपलब्ध करून दिला. ही कामे करणे शक्य असतानाही राष्ट्रवादी-काँगे्रसला ती करता आली नव्हती, आता ती मंजूर झाल्यावर फुकटचे श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादीची नेतेमंडळी उठून बसत आहेत,’ असा टोला सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सातारा येथे पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीला लगावला.

Web Title: Mobile military canteen now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.