साताऱ्यात पोलीस निरीक्षकाचा मोबाईल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:41 IST2021-09-03T04:41:36+5:302021-09-03T04:41:36+5:30
सातारा: पोलीस मुख्यालयासमोर असलेल्या पोलीस क्लबमधून पोलीस निरीक्षक अशोक पाटील यांचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी हातोहात लांबविला. ही घटना बुधवार, ...

साताऱ्यात पोलीस निरीक्षकाचा मोबाईल लंपास
सातारा: पोलीस मुख्यालयासमोर असलेल्या पोलीस क्लबमधून पोलीस निरीक्षक अशोक पाटील यांचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी हातोहात लांबविला. ही घटना बुधवार, दि. १ रोजी दुपारी बाराच्यासुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस निरीक्षक अशोक पाटील हे सध्या नियंत्रण कक्षात नेमणुकीस असून, पोलीस मुख्यालयासमोर असलेल्याऑफिसर क्लबमध्ये राहात आहेत. तेथील खोली क्रमांक तीमधून पाटील यांचा २५ हजार रुपयांचा महागडा मोबाईल चोरट्याने लंपास केला. काही वेळानंतर त्यांच्या मोबाईल खोलीत नसल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे या ऑफिसर क्लबमध्ये अधिकाऱ्यांशिवाय कोणीच प्रवेश करू शकत नाही. असे असताना येथून मोबाईल चोरीस गेला, तोही एका अधिकाऱ्याचा. त्यामुळे पोलीस मुख्यालयात खळबळ उडालीय. काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, बाहेरच्या व्यक्तीने ऑफिसर क्लबमध्ये येऊन चोरी केली असावी. खात्यातील व्यक्ती असा प्रकार करणार नाही.
मोबाईल चोरीस गेल्यानंतर काही वेळातच पाटील यांनी त्यांच्या मोबाईलवर फोन केला. तेव्हा मोबाईल स्वीच ऑफ असल्याचे निदर्शनास आले. चोरट्याने तत्काळ मोबाईल बंद करून तेथून पोबारा केल्याचे समोर येत आहे. या घटनेची सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
चाैकट : सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरू
चाैकट : पोलीस मुख्यालयाबाहेर तिन्ही बाजूंनी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. या सीसीटीव्हीत रस्त्यावरील सर्व दिसते. त्यामुळे ऑफिसर क्लबमध्ये दुपारच्यासुमारास नेमके कोण गेले, हे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर स्पष्ट होणार आहे.