Mobile impairs health | मोबाइलने आरोग्य बिघडवले

मोबाइलने आरोग्य बिघडवले

सातारा : लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन अभ्यासक्रमाच्या निमित्ताने मुलांच्या हातात मोबाइल गेल्याचा दुष्परिणाम आता पालकांना भोगावा लागत आहे. शारीरिक हालचाली होत नसल्याने मुलांची स्थूलता आणि वारंवार मोबाइलच्या वापराने ‘मायोपिया’ अर्थात अंधूक दिसण्याची समस्या वाढली आहे.

मोबाइल किंवा गॅझेटचा जास्त वापर केल्याने जवळच्या वस्तू सहज दिसतात. मात्र, दूरचे दिसत नाही. अशा समस्या अनेक घरांमध्ये मुलांसह तरुणाई आणि मध्यमवयीन लोकांमध्येही दिसू लागल्या आहेत. जीवनसत्त्वयुक्त आहार, नियमित व्यायाम आणि मोबाइल फोनचा मर्यादित वापर यामुळे डोळ्यांची ही समस्या दूर होऊ शकते, असे वैद्यकीयतज्ज्ञ सांगतात.

लॉकडाऊनमुळे कुठेही घराबाहेर न पडलेल्या मुलांना घरात कोंडून राहून गॅझेटच्या विश्वात अडकण्यात समाधान मिळत असल्याचेही आढळून येत आहे. त्यामुळेच शारीरिक अंतर राखून मुलांना खेळायला बाहेर घेऊन जाणे आणि त्यांच्या नैसर्गिक हालचाली होण्यासाठी पालकांनी अधिक प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

चौकट :

नाकावर चष्मा अन् हातात मोबाइल

लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन शिक्षणाच्या निमित्ताने मुलांच्या हातात आलेल्या मोबाइलने अनेकांच्या नाकावर चष्मेही आणले आहेत. शाळेच्या अभ्यासाबरोबरच मित्रमैत्रिणींच्या व्हाॅट्सअ‍ॅप ग्रुपने यात अधिकची भर घातली आहे.

पारंपरिक खेळ विस्मृतीत

शहरांमध्ये सिमेंटची जंगले वाढली, त्यामुळे घरापुढून अंगण आणि खुली क्रीडांगणे गायब झाली. परिणामी, सुरपारंब्या, लपंडाव, विटीदांडू यासारखे खेळ खेळायला आता जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे मुलांना या खेळाची माहिती आणि आकर्षण दोन्हीही राहिले नाही, ही वस्तुस्थिती आहे.

कोरोनाकाळात मोबाइल गेम खेळण्याचे प्रमाण वाढले

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सर्वच शाळा ऑनलाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्र मोबाइलही देण्यात आला. याचा अभ्यासावर सकारात्मक आणि प्रकृतीवर नकारात्मक परिणाम झाला. अभ्यास संपल्यानंतर थोडा वेळ म्हणत बहुतांश मुलांना गेम्सचे वेड लागले.

कोट

आमच्याकडे सोसायटीत मुलांना खेळायला स्वतंत्र जागा आहे. पण, कोविडकाळात कोणीच खेळायला जात नसल्याने मुलाला मोबाइल देण्याशिवाय पर्यायच नव्हता.

- अनुष्का जांगीड, शहरी

मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी मोबाइल घरी ठेवला, तर त्यावर नाचगाणी आणि कार्टुन बघण्याकडेच त्यांचा कल आहे. आम्हाला मोबाइलचे काही समजत नाही, पण पोरं पटापट बटणं दाबून रिकामी होतात.

- संतोष आगलावे, ग्रामीण

इनडोअर गेम्स ६७

आउटडोअर गेम्स ३३.

Web Title: Mobile impairs health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.