‘मनसे’चा जिल्हाध्यक्ष रणजित भोसले गजाआड
By Admin | Updated: May 30, 2014 00:49 IST2014-05-30T00:48:13+5:302014-05-30T00:49:49+5:30
अपहरण प्रकरण : जामीन अर्ज फेटाळला

‘मनसे’चा जिल्हाध्यक्ष रणजित भोसले गजाआड
सातारा : येथील करंजे पेठेतील अनिल कस्तुरे यांचे पैशाच्या देवाण-घेवाणीवरून अपहरण केल्याच्या आरोपावरून आज, गुरुवारी शहर पोलिसांनी ‘मनसे’चे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांना अटक केली. काही दिवसांपूर्वी भोसले यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. तो न्यायालयाने आज फेटाळला. दि. ३ मे रोजी सायंकाळी अनिल कस्तुरे आणि त्यांची पत्नी राधिका दुचाकीवरून जात होते. त्यावेळी तवेरा व स्कॉर्पिओ या दोन गाड्यांमधून मनसेचा विद्यार्थी सेनेचा जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील व इतर पाच ते सहाजणांनी दुचाकी अडविली. तलवारीचा धाक दाखवून अनिल कस्तुरे यांचे त्यांनी अपहरण केले. त्यांची पत्नी वर्षा कस्तुरे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर ‘मनसे’चे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांच्यासह पाच ते सहाजणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. दुसर्या दिवशी अनिल कस्तुरे यांना पुसेगाव येथे ‘मनसे’च्या कार्यकर्त्यांनी सोडून दिले होते. त्यानंतर कस्तुरे जखमी अवस्थेत पुसेगाव पोलीस ठाण्यात हजर झाले होते. संभाजी पाटील याला पोलिसांनी त्याचवेळी अटक केली होती. (प्रतिनिधी)