फलटण पोलिसांच्या विरोधात ‘मनसे’ची तक्रार
By Admin | Updated: August 2, 2014 00:00 IST2014-08-01T23:46:19+5:302014-08-02T00:00:36+5:30
पोलीस अधीक्षकांना निवेदन : अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी

फलटण पोलिसांच्या विरोधात ‘मनसे’ची तक्रार
सातारा : फलटण तालुक्यातील पोलीस यंत्रणाच गुन्हेगारांना साथ देत आहे. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तालुक्यात बेकायदेशीर आणि अवैध धंदे, व्यवसाय वाढत असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष युवराज शिंदे यांनी शुक्रवारी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. आणि पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, फलटण तालुक्यातील गुन्हेगारीत वाढ होत आहे. फलटणचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र मोरे यांच्या कार्यकालात फलटणमध्ये गुन्हेगारी वाढली. पोलीस दलातील काही सहकाऱ्यांनी त्यांना मदत केली. फलटण येथील अरिहंत अॅटोमोबाईल्समधून नवीन मोटारसायकली चोरीस गेल्या होत्या. त्या हस्तगत केल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याची परस्पर विक्री केली होती. याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले. मात्र, आजही हा कर्मचारी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. फलटण येथील एका मिलमधून इलेक्ट्रिक मोटारी चोरीला गेल्या. त्या पकडल्यानंतर त्याची कोणतीही नोंद न करता आरोपींना सोडून देण्यात आले.
पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे फलटण येथील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. अनेकदा पोलीस दप्तरी गुन्ह्यांची नोंद संख्या कमी करण्यासाठी सर्वसामान्यांच्या तक्रारी दाखल करून घेतल्या जात नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. दरम्यान, यावर कोणतीही ठोस उपाययोजना नाही आखली तर कोणत्याही क्षणी फलटण शहर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी मिथिलेश दोशी, शिवाजी भोई आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)