पाच मतदारसंघात मनसेचे उमेदवार जाहीर
By Admin | Updated: September 25, 2014 23:30 IST2014-09-25T22:28:02+5:302014-09-25T23:30:42+5:30
विधानसभा : सातारा, वाई, फलटणला उमेदवारच नाही

पाच मतदारसंघात मनसेचे उमेदवार जाहीर
सातारा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील २८८ पैकी १५३ मतदारसंघांतील उमेदवारांची यादी गुरुवारी जाहीर केली असून, यामध्ये सातारा जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दरम्यान, फलटण, वाई आणि सातारा येथून मनसेला अजूनही उमेदवार निश्चित करता आलेला नाही. मनसेचे जिल्ह्यातील उमेदवार आजच अर्ज भरण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेनेही त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ असून, मनसेच्या यादीत यापैकी फक्त पाचच मतदारसंघांची नावे आहेत. माण-खटावमधून जिल्हाप्रमुख धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोरेगावातून युवराज पवार, कऱ्हाड उत्तरमधून राजू केंजळे, कऱ्हाड दक्षिणमधून विकास पवार आणि पाटणमधून रवींद्र शेलार यांना उमेदवारी देण्यात आली
आहे.
दरम्यान, गेल्या निवडणुकीत मनसेने फक्त पाटण मतदारसंघातूनच उमेदवार दिला होता. मात्र, त्यांच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले होते. यावेळी मात्र, मनसेने जिल्ह्यातील आठपैकी पाच विधानसभा मतदारसंघांत आपले उमेदवार दिले आहेत.
फलटण विधानसभा मतदारसंघ राखीव असून, येथे मनसेला उमेदवार मिळालेला नाही. साताऱ्यातून कोण उमेदवार यावरही अजून चर्चा झालेली नाही. मात्र, दोनच दिवसांत वाई मतदारसंघातील उमेदवार दोन जाहीर होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
मनसेचे मूळ साताऱ्यातच...
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपूर्वी राज ठाकरे यांनी साताऱ्यातील काही प्रमुख मान्यवरांशी चर्चा केली होती. मात्र, गेल्या निवडणुकीत त्यांनी सातारा जिल्ह्यातून फक्त एकच उमेदवार दिला होता. आजही राज ठाकरे सातारा दौऱ्यावर आले तर या मान्यवरांची चर्चा करतातच आणि पुढे काय करता येईल याचा ही आढावा घेतात.